मुंबई : शाकाहारींसाठी राखीव असलेल्या जागी बसून मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांना आयआयटी मुंबईत दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे आयआयटी मुंबई पुन्हा एकदा नव्या वादात सापडले आहे.
हेही वाचा – पनवेल येथे पाच दिवसांसाठी मध्यरात्रीचा ब्लॉक
हेही वाचा – घोडबंदर रस्ता सुस्थितीत! ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचा उच्च न्यायालयात दावा
काही दिवसांपूर्वी आयआयटी मुंबईतील खानावळीत मांसाहारास बंदी असल्याच्या आशयाचे फलक लावण्यात आले होते. त्यावरून संस्थेच्या आवारात वादंग झाले. विद्यार्थी संघटनांनी फलकावर आक्षेप घेतला. अखेर प्रशासनाने असा कोणताही नियम नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी १२, १३ आणि १४ क्रमांकाच्या वसतिगृहाच्या खानावळीतील सहा टेबल शाकाहारी विद्यार्थ्यांसाठीच राखीव ठेवण्यात आल्याची सूचना खानावळीच्या समन्वय समितीने (मेस काउन्सिल) दिली. या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी सोमवारी काही विद्यार्थ्यांनी शाकाहारींसाठी राखून ठेवलेल्या जागी बसून मांसाहार केला. त्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मूळ निर्णय आणि विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचा प्रकार हा भेदभाव करणारा आणि अस्पृश्यता पसरवणारा असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.