मुंबई : विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेला १९ मार्चपासून सुरुवात होत आहे. या परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रांवर कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावरील क्युआर कोड स्कॅन करण्याबरोबरच त्यांचा चेहरा पडताळणी, सीसी टीव्ही कॅमेऱ्यांबरोबरच पर्यवेक्षकांच्या अंगावरील कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
सामाईक प्रवेश परीक्षेदरम्यान गैरप्रकार होऊ नये यासाठी गतवर्षपासून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यास सुरुवात केली. गतवर्षी विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर क्युआर कोड लावण्यात आला होता. त्यातून मिळालेल्या निष्कर्षामुळे यंदा परीक्षा केंद्रांवर अधिक कडक उपाययोजना करण्याचा निर्णय घेत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सीसी टीव्ही कॅमेऱ्यांबरोबरच पर्यवेक्षकांच्या अंगावरही कॅमेरे लावण्याचे ठरवले आहे. परीक्षा केंद्रावरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यामुळे केंद्रांवर होणाऱ्या सर्व घडोमोडींवर बारीक नजर ठेवता येणार आहे. तर पर्यवेक्षकांच्या अंगावरील कॅमेऱ्यामुळे परीक्षा सुरू असताना प्रत्येक विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. पर्यवेक्षकांच्या शरीराच्या पुढील बाजूला हा कॅमेरा लावण्यात येणार असल्याने पर्यवेक्षकाच्या नजरेतून एखादी गोष्ट सुटली तरी ती कॅमेऱ्यामध्ये कैद होण्याची शक्यता आहे. यामुळे परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार टाळणे शक्य होणार असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील सूत्राकडून देण्यात आली.
विद्यार्थ्यांकडून होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सीसी टीव्ही व अंगावरील कॅमेऱ्यांची मदत घेण्यात येणार आहे. तसेच बोगस विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांवर प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्याची पडताळणी होणार आहे. ही पडताळणी करताना विद्यार्थ्यांनी अर्ज करताना दिलेले छायाचित्र आणि चेहरा यामध्ये ८० टक्के साम्य असणे आवश्यक असणार आहे. साम्य आढळले, तरच विद्यार्थ्याला प्रवेश केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. चेहरा पडताळणीदरम्यान विद्यार्थ्यांचा घेण्यात आलेला तपशील जतन करून ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी प्रवेशासाठी येईल त्यावेळी त्याने सादर केलेले छायाचित्र, त्याच्या अर्जावरील छायाचित्र आणि परीक्षेदरम्यानच्या चेहरा पडताळणीच्या वेळचा चेहरा यांचे तपशील जुळवण्यात येणार आहेत. यामुळे परीक्षेतील गैरप्रकार रोखण्याबरोबरच परीक्षा अधिक सुरक्षित आणि पादर्शकपणे पार पडण्यास मदत होणार आहे. तसेच भविष्यात आणखी नव्या तंत्रज्ञानाचा समावेश करून परीक्षेवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील सूत्रानी सांगितले.