मुंबई : विलेपार्ले येथील गोल्डन टोबॅको कंपनीच्या आवारातील मोकळ्या भूखंडावर भले मोठे स्टुडिओ बेकायदेशीररीत्या उभारण्यात आले असून या प्रकरणी महापालिकेने नोटिसा जारी केल्या आहेत. तात्पुरत्या परवानगीद्वारे कायमस्वरुपी स्टुडिओ उभारण्यात आले असून दिवसरात्र सुरु असलेल्या चित्रीकरणामुळे ध्वनी प्रदूषणाविरोधात स्थानिक रहिवाशांनी दंड थोपटले आहेत.
आठ एकरवर पसरलेल्या गोल्डन टोबॅको कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणात स्टुडिओ उभारण्यात आले आहेत. अमिताभ बच्चन, सलमान खान यांसारख्या अभिनेत्यांचे चित्रीकरण दिवसरात्र सुरु आहे. त्यामुळे शेजारील आठ-दहा सोसायट्यांना ध्वनी प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. हे तात्पुरते स्टुडिओ उभारले गेले नसते तर ध्वनी प्रदूषण झाले नसते, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. ॲक्मे रिजन्सी सहकारी गृहनिर्माण संस्थेने याबाबत इतर सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या सहीनिशी पत्र पालिका उपायुक्त, सहायक आयुक्त, जुहू पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना दिले आहे. परंतु तरीही हा उपद्रव सुरु असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
मोकळ्या भूखंडावर कुठलेही बांधकाम करण्यासाठी पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. मात्र या ठिकाणी पालिकेच्या के पश्चिम विभागाने शेड उभारण्यासाठी तात्पुरती परवानगी दिली. या तात्पुरत्या परवानगीच्या जोरावर या ठिकाणी पक्के बांधकाम असलेले स्टुडिओ उभारण्यात आले आहेत. तात्पुरत्या परवानगीमध्ये पक्के बांधकाम करता येत नाही. रीतसर इमारत प्रस्ताव विभागाने अधिकृत परवानगी दिली असती तर पक्के बांधकाम होऊन आवश्यक ती काळजी घेतली गेली असती. त्यामुळे आवाज प्रदूषणही झाले नसते, याकडे रहिवाशांनी लक्ष वेधले. टहे सर्व स्टुडिओ एकमेकांना खेटून असून आगीसारखी घटना घडली तर मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत वॉच डॉग फौंडेशनचे गॉडफ्रे पिमेंटा, निकोलस अल्मेडा, अॅड. व्हिव्हिअन डिसोझा, रीता डिसोझा, टुलीप मिरांडा यांनी पालिका आयुक्तांकडे याआधीही तक्रार केली होती. त्यानंतर या स्टुडिओंविरुद्ध थातुरमाथूर कारवाई करण्यात आली. आता पुन्हा हे स्टुडिओ उभे राहिले आहेत. तात्पुरती परवानगी सहा महिन्यांसाठी असते. अग्निशमन दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले असले तरी त्यातील अटींचे पालन केले आहे किंवा नाही हे तपासावे लागेल, असे अंधेरी अग्निशमन केंद्रातील एका अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी सांगितले.