मानव-बिबटय़ा संघर्षांच्या घटना नियमितपणे घडत असल्याच्या पाश्र्वभूमीवर ठाणे वन विभागाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिक्षेत्राबाहेर मनुष्यवस्त्यांमध्ये वावरणाऱ्या बिबटय़ांचा अभ्यास करण्यासाठी विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत बिबटय़ांचा अधिवास, स्थानिक स्थलांतर आणि त्यामागील कारणांचा शोध घेण्यात येणार आहे. वन्यजीव बचावासाठी कार्यरत असलेल्या संस्था आणि स्वतंत्ररीत्या संशोधन करणारे संशोधक यांच्या माध्यमातून कॅमेरा ट्रॅपिंगने हा अभ्यास करण्यात येईल.

गेल्या वर्षभरात राष्ट्रीय उद्यानापासून दूर असलेल्या लोकवस्तींमध्ये बिबटय़ा शिरल्याच्या अनेक घटना घडल्या. सहा महिन्यांपूर्वी अंधेरी आणि मुलुंड परिसरात बिबटय़ाच्या वावराने गोंधळ उडाला होता. गोरेगाव येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या छावणीमध्ये बिबटय़ा शिरलेली घटना ताजी आहे. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्राबाहेर फिरणाऱ्या किंवा वास्तव्यास असणाऱ्या बिबटय़ांच्या शास्त्रीय अभ्यासाला सुरुवात करण्यात आली आहे. यावर्षीच्या बिबटय़ा प्रगणनेनुसार राष्ट्रीय उद्यानाच्या परिक्षेत्रात ४१ बिबटय़ांचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. सहज खाद्याच्या उपलब्धतेमुळे उद्यानाच्या परिक्षेत्राबाहेरील वस्त्यांमध्ये बिबटय़ाचा अधिवास वाढल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदविले होते. या अनुषंगाने लोकवस्तीनजीक  वाढलेली बिबटय़ांची हालचाल टिपण्याच्या उद्देशाने आणि त्यामागील कारणांचे वेध घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात येणार असून संबंधित संस्थांना २५ ते ३० कॅमेऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे वन विभागाचे उपवनसंरक्षक  डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. मानधनाशिवाय स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या संस्थांमुळे या अभ्यासासाठी कोणताही निधी खर्च करावा लागणार नाही, असेही रामगावकर यांनी स्पष्ट केले. यापूर्वी मानव-बिबटय़ा संघर्ष घडलेल्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅपिंगच्या आधारे बिबटय़ाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते. मात्र या अभ्यासामध्ये राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या लोकवस्तीसोबतच आजवर निरीक्षण न झालेल्या क्षेत्रांचा सामावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

आयआयटी पवई, विहार तलाव आणि भांडुप कॉम्प्लेक्सच्या परिसरात अभ्यासाचे काम करण्यासाठी वन विभागाकडून दहा कॅमेरे घेतल्याची माहिती ‘पॉझ’ संस्थेचे सुनीश कुंजू यांनी दिली.

आयआयटीच्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आवश्यक परवानग्या मिळविण्याचे काम सुरू असून त्या मिळाल्यानंतर ‘रॉ’ संस्थेचे पवन शर्मा यांच्या सहकार्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल. तसेच संबंधित परिसरात भीती पसरू नये यासाठी बिबळ्यांची ठिकाणांनुसारची माहिती जाहीर केली जाणार नाही, असेही ते म्हणाले.

मुलुंड, ठाणे, घोडबंदर प्रमुख कार्यक्षेत्र

मुलुंड, ठाणे, घोडबंदर रोड, नागला, भांडूप, आयआयटी पवई आणि विहार तलावाचा परिसर या अभ्यासाच्या केंद्रस्थानी आहे. नऊ कॅमेऱ्यांच्या साहाय्याने या अभ्यासाच्या प्रत्यक्ष कामाला टप्प्याटप्प्याने सुरुवात केल्याची माहिती ‘ट्रॅक’ संस्थेचे नितेश पांचोळी यांनी दिली. यासाठी ठाणे, मुलुंड, घोडबंदर रोड हे प्रमुख कार्यक्षेत्र असून स्थानिकांना विश्वासात घेऊन कॅमेरे लावण्याचे काम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.