बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर आता हे प्रकरण चांगलेच पेटले आहे. अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्ता हिने आरोप केल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांची नावे समोर आली आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावरही आता एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. तनुश्री दत्ताने याविषयात आवाज उठवल्यानंतर अनेक महिलांनी या मोहिमेत सहभागी होत आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारांची माहिती दिली आहे. यामध्ये बॉलिवूडमधील संस्कारी बाबू अलोक नाथ, रजत कपूर, कैलाश खेर, विकास बहल यांचा समावेश आहे. सुभाष घई यांच्यावरील आरोपामुळे या यादीत भर पडली आहे.

या महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर सुभाष घई यांनी चित्रपटाच्या शूटींगदरम्यान अमली पदार्थाचं सेवन करुन आपल्यावर बलात्कार केला असे तिने म्हटले आहे. ती म्हणते, सुरुवातीला ते मला गाण्यांच्या रेकॉर्डिंगसाठी घेऊन जात असत. इतकेच नाही तर याठिकाणी इतर पुरुष सहकाऱ्यांबरोबर रात्री उशीरापर्यंत बसवून ठेवत असत. काही वेळेस ते मला घरी सोडविण्यासाठी येत. तेव्हा ते माझ्या मांडीवर हात ठेवत असत. त्यानंतर मी त्यादिवशी चांगले काम केल्याबद्दल ते मला बराच वेळ मिठीही मारत असत. त्यांच्या लोखंडवाला येथील घरी त्यांचे कुटुंबिय राहात नसत त्यामुळे चित्रपटाच्या संहितेचे वाचन करण्यासाठी ते मला बोलवत. त्यावेळीही ते माझ्याशी अतिशय असभ्य वर्तन करायचे. या महिलेने घई यांनी आपल्याशी कशाप्रकारे लगट करण्यास सुरुवात केली हेही सांगितले. मग घाबरुन आपण त्याठिकाणहून निघून गेलो असे ती म्हणाली. पण त्यावेळी मला कामाची गरज असल्याने मी त्यांच्यासोबतचे काम सोडायला तयार नव्हते असे ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

एक दिवस म्युझिक सेशन झाल्यानंतर त्यांनी दारु पिण्याचा बेत आखला. त्यावेळी त्यांनी मलाही प्यायला लावले. त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या कारमध्ये बसवले. ते मला घरी सोडत आहेत असे मला वाटले पण त्यांनी मला एका हॉटेलमध्ये नेले आणि माझ्यावर अतिप्रसंग केला. मी रडले आणि विरोधही केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मला घरी सोडले. मग मी काही दिवस कामावर जाणे टाळले. मात्र मी मधेच काम सोडले तर पैसे देणार नाही असे त्यांनी सांगितल्याने मला पुन्हा कामावर जावे लागले. MeToo च्या निमित्ताने या नामांकित दिग्दर्शकाच्या बाबतीतील ही गोष्ट समोर आली आहे. सुभाष घई यांनी हिरो, त्रिमुर्ती, कर्मा, ताल, परदेस, रामलखन यांसारखे अनेक गाजलेले चित्रपट घई यांनी दिग्दर्शित केले आहेत.

Story img Loader