मुंबई : मुंबई उपनगरात सुरू असलेली रस्त्याची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करा, आता कोणतेही नवीन काम हाती घेऊ नका, रस्त्याची कामे पूर्ण केल्याचा रस्तेनिहाय अहवाल १५ दिवसांत द्या, पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिल्या.
वांद्रे, खार, सांताक्रूझ पश्चिम विभागात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी केली. यावेळी शेलार यांनी वरील निर्देश दिले. या पाहणीला अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आणि संबधित अधिकारी उपस्थित होते. तसेच जलअभियंता विभाग, पर्जन्य जलवाहिन्या विभाग, रस्ते विभाग आदी विभागांचे अधिकारी व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.
खड्डेमुक्त रस्त्यांसाठी मुंबई महानगरपालिकेने रस्ते काँक्रीटीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत १ हजार ३३३ किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे काम दोन टप्प्यांमध्ये हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यामधील एकूण ६९८ रस्त्यांची कामे (३२४ किलोमीटर) तर, दुसऱ्या टप्प्यात एकूण १४२० रस्त्यांचे (३७७ किलोमीटर) काँक्रीटीकरण प्रस्तावित आहे. ही कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. रस्ते कामांसाठी ९ कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. काही कंत्राटदार अपेक्षित गतीने, तर काही कंत्राटदार धीम्या गतीने कामे करीत आहेत. उपनगरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे उपनगरवासियांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे निकृष्ट असल्यामुळे वारंवार रस्ते खोदावे लागत आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या एच पश्चिम विभागातील वांद्रे, खार, सांताक्रूझ पश्चिम या भागातील ७४ रस्त्यांची सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. या कामांची पाहणी शेलार यांनी केली. त्यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विविध निर्देश दिले. रस्त्यांची कामे करताना विविध उपयोगिता वाहिन्यांच्या संस्थांसोबत समन्वय नसल्याकडे शेलार यांनी यावेळी प्रशासनाचे लक्ष वेधले.
– प्रत्येक रस्त्याच्या कामादरम्यान उपयोगिता वाहिन्या टाकण्याचेही काम सुरू आहे. या वाहिन्या टाकण्यासाठीही समन्वयाच्या अंतिम तारखा ठरवा व ३१ मेपूर्वी त्या रस्त्यांची कामे पूर्ण करा.
– रस्त्याच्या कामादरम्यान जलवाहिन्या, गॅसवाहिन्या, विद्युत वाहिन्या आदी उपयोगिता वाहिन्यांचे नुकसान झाले आहे. त्याचा मुंबई महापालिकेने आढावा घ्यावा. वांद्रे, सांताक्रूझ परिसरातील अशा घटनांवर कोणती कारवाई करणार, ३१ मेपूर्वी काम कसे पूर्ण करणार ? त्याचे वेळापत्रक सादर करावे असेही निर्देश त्यांनी दिले.
– गुरु नानक पार्क, खार जिमखाना, वांद्रे जिमखाना, दौलत नगर आयलँड येथील वर्तुळाकार रस्ते मधुपार्क सहित सांताक्रूझपर्यंत पूर्ण करावे.
– अतिरिक्त आयुक्तांनी प्रत्येक रस्तेनिहाय पूर्णत्वाचा अहवाल १५ दिवसांत सादर करावा.