मुंबईच्या उपनगरी गाडय़ांचा रंग आता अधिक गडद होणार आहे. दरवाजात उभे राहून पानाच्या पिचकाऱ्या मारणाऱ्यांमुळे डब्याजवळ रंग अधिक खराब दिसत असल्यामुळे रंगामध्ये फरक करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांचा रंग २००६ मध्ये बदलण्यात आला होता. फिकट जांभळ्या आणि पांढऱ्या रंगसंगतीमध्ये असणाऱ्या या गाडय़ा मुंबईकरांच्या डोळ्याला सुखावत असल्या तरी पानाच्या पिचकाऱ्यांमुळे रंगावर त्या अधिक उठून दिसत होत्या. यावर उपाय काढण्यासाठी आणि गाडी खराब दिसू नये यासाठी हा प्रयत्न असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. संपूर्ण गाडी गडद जांभळ्या आणि पांढऱ्या रंगातील असली तरी मोटरमनची केबिनच्या पुढील भाग हे पिवळ्या रंगातील असतील. अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन या संस्थेने नवे डब्यांचे आरेखन आणि रंगसंगती ठरवली आहे. मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प दोन अंतर्गत सुमारे ७२ नव्या गाडय़ा मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात सामील केल्या जाणार आहेत. त्यातील दोन गाडय़ा २०१३ मार्चपर्यंत येतील, असे रेल्वे सूत्रांनी सांगितले. सध्याच्या गाडय़ा सिमेन्स कंपनीच्या असल्या तरी पुढील कंत्राट हे बम्बार्डिअर कंपनीकडे देण्यात आले आहे.     

Story img Loader