सुशांत मोरे
करोनामुळे लागू झालेले कडक निर्बंध आणि आर्थिक मंदी याचा उद्योधंद्याना बसलेला फटका, अनेकांच्या नोकऱ्यांवर आलेली गदा, तर काही कर्मचाऱ्यांच्या वेतनात झालेली कपात यामुळे नागरिक त्रस्त होते. मात्र असे असले तरी महागड्या वाहनांच्या खरेदीमध्ये मुंबई उपनगर परिसराने आघाडी घेतली आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत मुंबईतील उपनगरांत ५० लाखांहून अधिक किंमतीच्या ६५८ वाहनांची खरेदी करण्यात आल्याची माहिती बोरिवली आणि अंधेरी आरटीओतील अधिकाऱ्यांनी दिली. दोन्ही आरटीओंना करापोटी ८१ कोटी ७३ लाख २९ हजार रुपये महसूल मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई उपनगरवासियांनी स्कोडा, फॉक्सवॅगन या वाहनांना सर्वाधिक पसंती दर्शविली आहे. त्यापाठोपाठ मर्सिडीज, फेरारी, टोयाटो, जॅगवार, लॅण्ड रॉवर, स्कोडा, बीएमडब्लू, पोर्शे जर्मनी, रोल्स रॉयस, ऑडी, व्हॉल्वो, इत्यादी कंपन्यांच्या वाहनांच्या खरेदीकडे उपनगरवासियांचा कल होता.

जानेवारी ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अंधेरी आरटीओत ५० लाखाहून अधिक किंमतीच्या ४९२ वाहनांची नोंदणी झाली असून करापोटी ६२ कोटी ३९ लाख ३८ हजार ४९५ रुपयेआरटीओला मिळाले. मर्सिडीज बेन्ज कंपनीच्या तब्बल २१६ वाहनांची खरेदी झाली. त्यापाठोपाठ बीएमडब्लू कंपनीच्या १४० वाहनांची नोंद झाल्याची माहिती आरटीओतील अधिकाऱ्यांनी दिली.

बोरिवली आरटीओत १६६ वाहनांची नोंदणी झाली असून करोपोटी १९ कोटी ३३ लाख ९१ हजार ०९१ रुपये मिळाले. मर्सिडीज बेन्जच्या ८२ आणि बीएमडब्लूच्या ५५ वाहनांची खरेदी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

महागड्या वाहनांवर १३ टक्के व त्यापेक्षा जास्त कर आकारला जातो. त्यामुळे अंधेरी आणि बोरिवली आरटीओला करापोटी ८१ कोटी ७३ लाख २९ हजार रुपये मिळाले आहेत. या दोन्ही आरटीओत सर्वाधिक चारचाकी वाहनांची नोंदणी झाली आहे. बोरिवली आरटीओत विजेवर धावणाऱ्या एका वाहनांची नोंद झाली आहे. दरम्यान, ताडदेव आणि वडाळा आरटीकडून याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

करोनाच्या सुरुवातीच्या काळातही एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ताडदेव, वडाळा, अंधेरी, बोरिवली आरटीओत मिळून तीन हजार ६७९ आलिशान अशा महागड्या गाड्यांची नोंदणी झाली होती. त्यावेळीही आरटीओला करापोटी कोट्यवधी रुपये मिळाले होते.