मुंबई : वाळकेश्वर येथील बाणगंगा तलाव पुनरुज्जजीवित करण्याचा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला आहे. अकराव्या शतकातील रामकुंड पुनरुज्जीवित करणे आणि त्याला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सध्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले रामकुंड नुकतेच कामगारांना आढळले.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मलबार हिल परिसराचे आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या निर्देशानुसार पालिका प्रशासनाने बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प हाती घेतला आहे. परिसरातील अतिक्रमणे हटवून त्याचे वारसापण जतन करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. बाणगंगा येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करणे आणि भाविकांसाठी धार्मिक विधी करणे सुलभ व्हावे याकरिता हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले रामकुंड शोधून ते जतन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
हेही वाचा >>> ‘आपला दवाखाना’ लाभार्थींची संख्या २३ लाखांवर; नागरिकांचा वाढता प्रतिसाद
बाणगंगा तलावापासून ४०० मीटर अंतरावर हे कुंड नुकतेच सापडले असल्याची माहिती पालकमंत्री लोढा यांनी दिली. आता गोमुख स्वच्छ करून पूर्ववत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रामकुंडाचा वापर अस्थी विसर्जन आणि अंतिम विधीसाठी केला जात होता. मात्र अनेक दशके वापरले न गेल्यामुळे ते ढिगाऱ्याखाली गाडले गेले, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. अतिक्रमण हटवणे, जीर्णोद्धाराचे काम हाती घेणे, दर्शनी भाग खुला करणे, दगडी पायऱ्या दुरुस्त करणे आणि राम कुंडाचे पुनरुज्जीवन करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. या योजनेमध्ये अस्थी विसर्जनासाठी सुविधा निर्माण करणे आणि दिवे आणि फुले बाजूला एका लहान टाकीमध्ये ठेवण्यासाठी सार्वजनिक कोनाडे तयार करणे, त्याद्वारे मुख्य टाकी जतन करणे आणि स्वच्छ ठेवणे या बाबींचा समावेश आहेत.