संदीप आचार्य, लोकसत्ता
मुंबई- उत्तर प्रदेशमधील आकाश यादव या अठरा वर्षाच्या तरुणाला लहानपणापासून यकृताचा त्रास होत होता. उत्तर प्रदेश, बिहार तसेच हरयाणा येथे उपचार करून अखेर त्याने मुंबईतील महापालिकेचे शीव रुग्णालय गाठले. खरेतर यकृताचा आजार बळावल्यानंतर तो शीव रुग्णालयात पोहोचला होता. शीवमधील गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी व इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी विभागाच्या डॉक्टरांनी त्याच्या आवश्यक त्या सर्व चाचण्या केल्या आणि त्याच्या जीवाला असलेला धोका कुटुंबीयांना समजावून सांगून शस्त्रक्रिया केली. यात यकृताकडे रक्तवाहिनीद्वारे येणारा रक्तपुरवठा हृदयाकडे सुरक्षितपणे वळविण्यात आला. वेगवेगळ्या विभागांच्या टीमवर्कच्या माध्यमातून ही यकृताची बायपास यशस्वी केल्याचे इंटरव्हेन्शन रेडिओलॉजी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. विवेक उकिर्डे यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे हाच आकाश सध्या शीव रुग्णालयातच सोशल वर्कर म्हणून काम करत आहे.
आकाश यादव शीव रुग्णालयात पोहोचला तेव्हा खरंतर त्याच्या यकृताचा आजार बराच बळावला होता. गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी विभागाच्या डॉक्टरांनी त्याची काळजीपूर्वक तपासणी केली. त्यानंतर रेडिओलॉजी विभागातील डॉक्टरांनी सीटी स्कॅन व एमआरआय काढला तेव्हा त्याला ‘बड चियारी सिंड्रोम’ हा आजार असल्याचे निदान झाले. खाजगी रुग्णालयात या आजारावरील उपचारासाठी सुमारे १० लाख रुपये खर्च येतो. शीव रुग्णालयातही त्याला दीड लाख रुपये उपचारासाठी लागणार होते. अर्थातच ते आकाश व त्याच्या कुटुंबीयांकडे नव्हते. त्यामुळे शीव रुग्णालयाच्या डॉक्टरांनी रुग्णालयात नेहमी रुग्णांना मदतीचा हात पुढे करणाऱ्या ‘संडे फ्रेन्डस’संस्थेला विनंती केली. त्यांनीही दीड लाख रुपयांची मदत केली आणि आकाशच्या शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला.
आकाशच्या यकृताकडून ह्रदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या बंद झाल्या होत्या. त्यामुळे यकृतावर ताण येऊन मोठ्या प्रमाणात सूज आली होती. या आजाराचे अनेक रुग्ण आढळतात. तथापि, आकाशच्या बाबतीत आव्हान होते ते म्हणजे त्याच्या यकृताच्या कार्यप्रणालीवर बराच परिणाम झाला होता. त्यामुळे रक्तातील काविळीचे प्रमाण जे सामान्यत: १ एवढे असते ते ४८ पर्यंत पोहोचल्याचे डॉ विवेक उकिर्डे यांनी सांगितले. या आजारावर ‘डायरेक्ट इंट्राहेपेटिक पोर्टो सिस्टिमिक शंट’ हा उपचार केला जातो. म्हणजे यकृताचा रक्तप्रवाह हा थेट ह्रदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीद्वारे ह्रदयाकडे वळवला जातो. कोणतीही मोठी शस्त्रक्रिया न करता मानेमध्ये एक छेद किंवा छिद्र पाडून त्याच्या माध्यमातून प्रक्रिया केली जातो. उपचार न केल्यास जीवाला नक्की धोका होता, तसेच उपचारादरम्यानही असलेल्या धोक्याची रुग्णाच्या नातेवाईकांना कल्पना देण्यात आली होती.
या शस्त्रक्रियेनंतर आज आकाश यादव पूर्णपणे बरा झाला असून शीव रुग्णालयातच सोशल वर्कर म्हणून तो काम करत आहे. रेडिओलॉजी विभागाच्या डॉ अनघा जोशी, डॉ विवेक उकिर्डे, डॉ कुणाल अरोरा, डॉ अक्षय, डॉ कुशल, डॉ कृष्णा, डॉ पियुष, डॉ अनंत व डॉ अक्षय मोरे तसेच गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ मेघराज इंगळे, डॉ साईप्रसाद व ॲनॅस्थेशिया विभागाच्या शंतनु कुलकर्णी व डॉ शीतल यांचा या उपचारात सहभाग होता. इंटराव्हेन्श्नल रेडिओलॉजी विभागाची स्थापन २०१६ मध्ये झाली असून सुमारे साडेआठ कोटी रुपयांच्या ‘डिजिटल सबट्रॅक्शन अँजिओग्राफी’ (डिएसए) मशिनच्या माध्यमातून विभागात महिन्याकाठी दोन ते अडीच हजार रुग्णांवर वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. यात यकृताच्या वेगवेगळ्या आजारांपासून रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकवर उपचार केले जात असल्याचे डॉ विवेक उकिर्डे यांनी सांगितले.