मुंबई : घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने केलेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अभिनेता सैफ अली खान याच्यावर लीलावती रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफवरील शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, त्याच्या जिवाला कोणताही धोका नाही. आता त्याची प्रकृती सुधारत असून त्याला लीलावती रुग्णालयातील अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहिती लीलावती रुग्णालयाचे ‘चीफ ऑपरेटिंग ऑफिसर’ डॉ. नीरज उत्तमनी यांनी दिली.
सैफ अली खानच्या निवासस्थानी गुरुवारी पहाटे शिरलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यात सैफ जखमी झाला. त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर धारदार शस्त्राने सहा वार करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्याला दोन ठिकाणी खोलवर जखमा झाल्या असून, एक जखम मणक्याजवळ होती. त्याच्या मणक्यात चाकू घुसल्याने मोठी दुखापत झाली. चाकू काढण्यासाठी आणि मणक्यातील द्रव थांबविण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या डाव्या हाताला आणि मानेच्या उजव्या बाजूलाही आणखी दोन खोल जखमा होत्या.
सुघटनशल्य चिकित्सक डॉ. लीना जैन यांच्या नेतृत्वाखाली सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास कुडवा यांनी शस्त्रक्रियेचे निरीक्षण केले. शुक्रवारी सकाळी त्याला सामान्य कक्षामध्ये हलविण्यात येईल. त्यानंतर एक-दोन दिवसांनी घरी सोडण्यात येईल, अशी माहिती मज्जातंतुतज्ज्ञ डॉ. नितीन डांगे यांनी दिली.
हेही वाचा >>> शस्त्रक्रियेनंतर प्रकृती स्थिर; तपासासाठी दहा पथके ; एक कोटीची मागणी करत सैफवर हल्ला
परिसरातील कर्मचाऱ्यांचीही चौकशी
सैफ व त्याचे कुटुंब इमारतीच्या ११ व्या व १२ व्या मजल्यावर राहते. वरच्या मजल्यावर सर्व पुरूष कर्मचारी होते. आरडओरडा झाल्यानंतर सर्वजण वरच्या मजल्यावर गेले. त्यावेळी तेथील कर्मचारी रमेश, हरी, रामू व पासवान सर्व आवाज ऐकून बाहेर आले. त्यानंतर आरोपीला ११ व्या मजल्यावर शोधले असता तो तेथे सापडला नाही. पोलिसांनी इमारत परिसरातले सीसीटीव्हींचे चित्रिकरण ताब्यात घेतले आहे. जेथे झटापट झाली त्या खोलीतही सीसीटीव्ही आहे. सैफच्या घराला इलेक्ट्रीक लॉक असल्याने बाहेरून दरवाजा उघडता येत नाही. याप्रकरणी स्थानिक पोलिसांची १० पथके तपासासाठी नियुक्त करण्यात आली आहेत. स्थानिक पोलिसांसह मुंबई गुन्हे शाखेची पथकेही याप्रकरणी समांतर तपास करत आहेत. आरोपींना शोधण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासत आहेत. तसेच परिसरातील इमारतींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येत आहे.
घटना चिंताजनक सुळे
खासदार सुप्रिया सुळे यांनी सैफ अली खानच्या कुटुंबीयांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून हल्ल्याची माहिती घेतली. याबाबत सुळे म्हणाल्या, ‘ही घटना चिंताजनक आहे. सैफ अली खान यांच्या कुटुंबीयाचा जबाब आल्यानंतरच त्यावर बोलणे योग्य राहील. सैफचे किंवा कोणाचेही घर असू दे, अशा घटना चिंताजनक आहेत. गेल्या काही दिवसांत होत असलेल्या हल्ल्यांच्या घटनेचा आणि सैफ अली खानवरील हल्ल्याच्या घटनेचा काही संबंध असेल, असे वाटत नाही.’
खोलवर जखमा
सैफ अली खानवर मज्जातंतुतज्ज्ञ डॉ. नितीन डांगे, सुघटनशल्य चिकित्सक डॉ. लीना जैन, भूलतज्ज्ञ डॉ. निशा गांधी, डॉ. नीरज उत्तमनी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने यशस्वी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती सुधारत आहे. जखमा खोलवर असल्या तरी लीलावती रुग्णालयातील डॉक्टर व त्यांच्या पथकाने योग्य व उत्तम उपचार केल्याची माहिती डॉ. नीरज उत्तमनी यांनी दिली.
उपचारानंतर सैफ अली खानची प्रकृती सुधारत आहे. त्याला लीलावती रुग्णालयाकडून सर्वोत्तम वैद्याकीय सेवा देण्याची हमी आम्ही देत आहोत.
– प्रशांत मेहता, विश्वस्त, लीलावती रुग्णालय
मान्यवरांकडून निषेध
शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी राज्य सरकार यापुढे प्रयत्न करणार आहे. सैफ अली खानवर हल्ला कोणी, कोणत्या उद्देशाने व कसा केला, याविषयी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीमाध्यमांना माहिती दिली आहे.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याचा प्रकार मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था किती ढासळली आहे, याचे लक्षण आहे. राज्य शासनाने, विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असल्याने त्यांनी या गोष्टींकडे गांभीर्याने पहावे.
– शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार)
पद्माश्री पुरस्काराने सन्मानित अभिनेत्यावरील खुनी हल्ल्यामुळे महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. भाजप युती सरकारमध्ये गुंडाराज फोफावले आहे.
– नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था उरलेली नाही. मुंबई असो, बीड असो किंवा परभणी सगळीकडे कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर आहे. बुधवारी पंतप्रधान मुंबईत असताना महाराष्ट्रात काय चाललेय? – संजय राऊत, खासदार, शिवसेना (ठाकरे गट)
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या, अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार व आता सैफ अली खानवरील चाकू हल्ल्याने कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेेत.
– वर्षा गायकवाड, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस
अभिनेता सैफअली खान याच्यावरील हल्ल्याने गेल्यावर्षी अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबाराचे प्रकरण पुन्हा स्मृतीपटलावर आणले. चित्रपटसृष्टीतील कलाकार, अभिनेते हे खंडणीखोरांच्या निशाण्यावर असल्याचे दिसते आहे. यापूर्वी अशा अनेक घटनांची नोंद झाली आहे.
● सलमान खान
वांद्रे परिसरातील अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर १४ एप्रिल,२०२४ ला करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात लॉरेन्स आणि अनमोल बिश्नोईविरोधात गुन्हा दाखल आहे. बिश्नोईने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली होती. याशिवाय अनमोल माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील आरोपींच्या संपर्कात होता.
● सुनील पाल
डिसेंबर २०२४ मध्ये, अभिनेता- हास्य कलाकार सुनील पाल यांचेही अपहरण झाले. अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडून २० लाख रुपयांची खंडणी मागितली आणि८ लाख रुपये मिळाल्यानंतर त्यांना मेरठमधील रस्त्यावर सोडून दिले. अपहरणकर्त्यांच्या टोळीतील नऊ सदस्यांनाही अटक करण्यात आली आहे.
● मुश्ताक खान
नोव्हेंबर २०२४ अभिनेता मुश्ताक खान यांचे कथितपणे अपहरण झाले, त्यांना मेरठमध्ये एका कार्यक्रमाच्या बहाण्याने बोलावण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी त्यांना बिजनोरमधील चहशेरी भागात ठेवले. एक दिवसानंतर खान सुटून मुंबईत परतले.
● शाहरुख खान
सुपरस्टार शाहरुख खान यांना मुंबई अंडरवर्ल्डकडून अनेक वेळा धमक्या आल्या आहेत आणि कुख्यात अबु सालेमकडूनही त्याला धमकावण्यात आले होते. सध्या शाहरुखला वायप्लस सुरक्षा आहे.
● प्रीती झिंटा
अभिनेत्री प्रीती झिंटा यांनाही चोरी चोरी चुपके चुपके चित्रपटावेळी खंडणीसाठी धमकावण्यात आल्याचे सांगितले होते. धमकी देणाऱ्यांनी ५० लाख रुपयांची मागणी केली होती.
● निर्माता दिनेश आनंद, अजित दिवानी
१४ फेब्रुवारी २००१ ला निर्माता दिनेश आनंद व ३० जून २००१ ला अभिनेती मनिषा कोयरालाचा माजी सचिव व निर्माता अजित दिवाणी यांची छोटा अबु सालेमने हत्या घडवून आणली होती. छोटा शकीलसोबत वादातनंतर सालेमने या दोघांच्या हत्या केल्याचे बोलले जाते.
● राकेश रोशन
निर्माता व दिग्दर्शक राकेश रोशन यांना खंडणीसाठी अबु सालेमकडून धमक्या आल्या होत्या. त्यानंतर २००० मध्ये दोन व्यक्तींनी गोळीबार केला. त्यांच्या हाताला गोळी लागली.