दक्षिण मुंबईत असलेल्या एकमेव ‘टोपाझ बार’मध्ये त्यावेळी सुंदर आणि आकर्षक नर्तिका होत्या. अनेक व्यावसायिक, राजकारणी टोपाझमधील व्हीव्हीआयपी लाऊन्जमध्ये बिनधास्तपणे वावरायचे. परंतु याची फारच चर्चा वाढल्याने अनेकांचा मोर्चा थेट विलेपाल्र्यात स्वामी विवेकानंद मार्गावरील दीपा बारकडे वळला.
सुधाकर शेट्टी याच्या मालकीचा हा बार तसा फार प्रसिद्ध नव्हता. परंतु नर्तिकांची किर्ती दूरवर पसरली होती. त्यामुळे बारमध्ये काळ्या धंदेवाल्यांचा राबता वाढत चालला होता.  
असे म्हणतात, की इथल्या नर्तिकांवर पैसे उधळण्यासाठी लोक गाडीच्या डिकीतून पैसे घेऊन येत असत. या काळातच सुधाकर शेट्टी हे व्यक्तिमत्त्व तमाम राजकारणी, धंदेवाले, पोलीसवाले, फिल्मवाले, बेटिंगवाले आदींच्या आवडीचे झाले. एकापेक्षा एक उत्तम नर्तिका या डान्सबारमध्ये होत्या. मर्सिडीझमधून येणाऱ्या नर्तिका ही त्यावेळी आख्यायिका नक्कीच नव्हती. एका चाळीतील चार पाच खोल्यामध्ये असलेला दीपा बार अल्पावधीतच अख्ख्या मुंबईत नावाजला जाऊ लागला. चाळवजा एकेक खोल्या विकत घेत दीपा बारचा पसारा इतका वाढला की, आतमध्ये किमान चार मोठे डान्सिग हॉल तयार झाले.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या हॉलमध्ये कोणालाच प्रवेश नव्हता. तेथे तरन्नूम (जिचा सातबंगला येथे बंगला होता व जिच्या घरात एक कोटींची रोकड सापडली होती.)सारख्या अनेकजणी असायच्या. अनेक चकमकफेम अधिकारीही या बारमध्ये दिसू लागले. मुंबईतल्या अव्वल सट्टेबाजांचाही हा अड्डा झाला होता. अनेक नर्तिका जणू पंटर असल्यासारख्या वावरत होत्या. पहाटेपर्यंत चालणारा हा बार कधी कधी व्हीव्हीआयपींसाठी सकाळपर्यंत चालायचा. उत्तर भारतातील अनेक राजकारणी येथे रात्रंदिवस पडलेले असायचे.
उत्तरेकडील एका लहानशा राज्याच्या वजनदार मुख्यमंत्र्यावर २००४ मध्ये ‘रेड’ पडली, आणि त्याने आपला पैसा इकडे वळविला. मग आणखीनच तेजीत.. शेजारीच ‘प्राईड’ नावाचे आलिशान रेस्तराँ सुधाकर शेट्टी याने सुरू केले. कोकणात मूळ असलेल्या एका मंत्र्याची साथ मिळाल्यानंतर सुधाकर शेट्टी याने बांधकाम क्षेत्रातही उडी घेतली.
डान्सबारवर गदा आली तेव्हा सुधाकर शेट्टीने अगोदरच बांधकाम व्यवसायात शिरकाव केला होता. वरळीतील कामगार नगरसारखा मोठा परिसर शेट्टीच्या सहाना ग्रुपकडे आला. सहाना ग्रुपशी अनेकांचे साटेलोटे असल्याचे बोलले जाते. परळ-वरळीतील गरीब मध्यमवर्गीयांना प्रसंगी धाकदपटशा दाखवून उत्तुंग संक्रमण शिबिरात जाण्यास भाग पाडले जाते, असा आरोप होतो. झोपु प्राधिकरणही त्याच्यासाठी सर्व नियम जणू धाब्यावर बसवते, अशी शंका व्यक्त होते. किंबहुना राजकीय दृष्टय़ा प्रचंड प्रभावशाली बनलेल्या सुधाकर शेट्टी यांच्या नादालाच कुणी लागत नाही, असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.