शिवसेना ( ठाकरे गट ) माजी नगरसेवक सुधीर मोरे आत्महत्येप्रकरणी वकील नीलिमा चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नीलिमा चव्हाण यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. पण, निलिमा चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.
नीलिमा चव्हाण यांनी सुधीर मोरे यांना मानसिक त्रास दिल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला. त्यानंतर न्यायालयाने नीलिमा चव्हाण यांना जामीन फेटाळला.
रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर सयाजी मोरे यांनी गुरूवारी ( ३१ ऑगस्ट ) घाटकोपर आणि विद्याविहारदरम्यान रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी सुधीर मोरे यांच्या मुलाने नीलिमा चव्हाण यांनी वडिलांचा छळ केल्याचा आरोप करत रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा : “…मग उद्धव ठाकरेंनी मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही?” बच्चू कडूंचा सवाल
यानंतर अटकेच्या भीतीपोटी चव्हाण यांनी सोमवारी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. वकील सुबीर सरकार यांच्यामार्फंत दाखल केलेल्या याचिकेत खोट्या प्रकरणात गोवण्यात आल्याचं चव्हाण यांनी म्हटलं.
हेही वाचा : “तर तुमचा गुलाम राहीन, असं उद्धव ठाकरेंना म्हणालो, पण…”; बच्चू कडूंचं वक्तव्य चर्चेत
मोरेंनी छळवणूक थांबवण्याची विनंती केली, पण…
“माझ्याशी संबंध ठेवले नाहीतर आयुष्य संपवेन, अशी धमकी निलीमा चव्हाण यांनी मोरेंना दिली होती. मोरेंनी बोलणं बंद केल्यावर ब्लॅकमेल करण्याचं काम नीलिमा चव्हाण करत होत्या. आत्महत्येपूर्वी नीलिमा चव्हाण यांनी मोरेंना ५६ वेळा फोन केला होता. तसेच, व्हॉट्सअॅपवर मेसेज, ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल्स करण्यात आले होते. मोरेंनी चव्हाण यांना छळवणूक थांबवण्याची विनंती केली होती. पण, कोणतीही दया चव्हाण यांनी दाखवली नाही,” अशी बाजू सरकारी वकील इक्बाल सोलकर यांनी पोलिसांतर्फे मांडली आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलं आहे.