विधान परिषद निवडणुकीबाबत अनेक दावे केले जात आहेत. भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे देखील निवडणूक रिंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी भाजपाचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवर यांना भाजपाचे ६ आमदार खडसेंना मतदान करण्याच्या दाव्यावर प्रश्न विचारला. यावर सुधीर मुनगटींवर यांनी थेट उत्तर दिलं. “एकनाथ खडसेंनी ४० वर्षे भाजपाचं काम केल्यानं त्यांच्याशी भाजपाच्या आमदारांचे संबंध असणे गैर नाही,” असं मत व्यक्त केलं. तसेच असं असलं तरी ते खडसेंना मतदान करणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. ते सोमवारी (२० जून) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “अपक्ष आमदार व महाविकासआघाडीचे असंतुष्ट आमदारांनी या सरकारला राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेत धक्का देण्याची सूचना केली. म्हणून भाजपाने या नियोजनाच्या आधारावर, सहकार्याच्या आश्वासनावर पाचवा उमेदवार उभा केला आहे. आम्हाला विश्वास आहे की राज्यसभेप्रमाणे याही निवडणुकीत भाजपाचे सर्व उमेदवार विजयी होतील. विकासाच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरू या भावनेतून आम्ही काम करत आहोत.”
हेही वाचा : मोहफुलाच्या दारूला विदेशी दारू म्हणणारे सरकार कुणालाही मुख्यमंत्री म्हणू शकेल : सुधीर मुनगंटीवार
एकनाथ खडसेंना सहा मतं भाजपातून मिळणार असल्याच्या चर्चेवरही सुधीर मुनगंटीवारांनी प्रतिक्रिया दिली. “भाजपाचे आमदार किंवा कार्यकर्ते कधीही पक्षाच्या धोरणाविरोधात वागत नाही हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. एकनाथ खडसेंनी ४० वर्षे भाजपाचं काम केल्यानं त्यांच्याशी भाजपाच्या आमदारांचे संबंध असणे गैर नाही. मात्र, यासंबंधांमधून भाजपाचे आमदार त्यांना मतदान करतील असं भाजपाच्या परंपरेनुसार कधीही शक्य नाही.”