मुंबई : महाराष्ट्रात भाजप सरकारच्या कार्यकाळात वाघांचे संरक्षण, संवर्धन चांगल्याप्रकारे करण्यात आले. आता वाघांची संख्या ३१२ वर गेली असून जंगलात त्यांच्या अधिवासासाठी जागा अपुरी पडत असल्याने स्थानांतरण करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनानुसार ‘तिथेही व इथेही’ वाघांचे संरक्षण व संवर्धन आणि स्थानांतरण करण्यात येईल, असा राजकीय टोला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला मंगळवारी विधान परिषदेत लगावला व सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले आणि राज्यात सत्तापालट झाला. वनविभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देण्याच्या निमित्ताने मुनगंटीवार यांनी संधी साधत शिवसेनेला टोला लगावला.