दुष्काळामुळे राज्याच्या साखर उत्पादनात यंदा तब्बल २५ लाख मेट्रिक टनाची घट होण्याचा सहकार विभागाचा अंदाज सपशेल खोटा ठरला असून दुष्काळी परिस्थितही गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही साखरेचा सुकाळ झाला आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील ऊसाची लागवड आणि उत्पादनातही ३०-४० टक्के घट होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने उसाला किमान उतारा चांगला मिळावा यासाठी यंदा महिनाभार विलंबाने, म्हणजेच १ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. हंगाम सुरू झाला तेव्हा सुमारे ६५ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र यंदा १६६ कारखान्यांनी ६९८ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून त्यातून ८० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. सातारा जिल्ह्य़ातील कृष्णा आणि सह्य़ाद्री हे दोन तर विदर्भातील पूर्ती आणि वैनगंगा अशा चार कारखान्यांमध्ये अजूनही गाळप सुरू आहे. त्यामुळे साखरेचे चांगले उत्पादन झाल्याचे सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या वर्षी राज्यात ९० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्या तुलनेत यंदा १० लाख मेट्रिक टन कमी उत्पादन झाले असले तरी सरकारच्या अंदाजापेक्षा खूप चांगले झाल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.