ऊसदर आणि साखर उद्योगाच्या अडचणीसंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी बोलाविलेली बैठक निष्फळ ठरली. राज्यातील साखर उद्योगाला केंद्राने मदत द्यावी, या मागणीसाठी मंगळवारी पंतप्रधानांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ नेण्याचा एकमात्र निर्णय वगळता या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांच्या उग्र आंदोलनाने जेरीस आलेले साखरसम्राट अधिकच अस्वस्थ झाले आहेत. साखर कारखान्यांनी तीन हजार रुपयांची पहिली उचल द्यावी अशी आंदोलकांची मागणी आहे.
खासदार राजू शेट्टी आणि शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील ‘साखरसम्राट’ अस्वस्थ झाले आहेत. त्यांना काहीतरी दिलासा मिळेल, या हेतूने मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे पाहिले जात होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी थेट केंद्राच्या कोर्टात चेंडू टोलविल्याने साऱ्यांचीच घालमेल वाढली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी व काँग्रेसमधील सारेच साखर सम्राट उपस्थित होते. गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे, दिवाकर रावते, बाळा नांदगावकर हे विरोधी नेतेही याप्रसंगी उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्र या साखर पट्टय़ात राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने दरावरून सुरू झालेल्या आंदोलनाचा फटका मुख्यत्वे राष्ट्रवादी काँग्रेसलाच बसत आहे. बाळासाहेब थोरात, डॉ. पतंगराव कदम, प्रतिक पाटील, हर्षवर्धन पाटील आदी काँग्रेस नेत्यांचेही कारखाने असल्याने त्यांच्यामध्येही अस्वस्थता आहे. आतापर्यंत कारखाने देतील तो भाव स्वीकारण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नसायचा, पण आता राजू शेट्टी वा रघुनाथदादा पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे शेतकरी जागृत झाले. म्हणूनच कारखाने चालविणे शक्य नाही, अशी भाषा कारखानदारांकडून सुरू झाली आहे. आगामी निवडणूक लक्षात घेता हे आंदोलन किती ताणायचे याचा विचार राजू शेट्टी यांना करावा लागणार आहे. कारण हातकणंगले या त्यांच्या मतदारसंघात साखर उद्योगावर अवलंबून असलेल्यांची संख्या जास्त आहे. त्यातच राष्ट्रवादीला त्रास होणार असल्याने काँग्रेसचे ठराविक नेते आंदोलनाना खतपाणी घालतात, असा आरोप होतो.
कराड आज पेटणार?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने युध्दभूमी म्हणून जाहीर केलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या कराडात रविवारी दुपारपासून शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत. सोमवारी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनीच ‘कराड बंद’ ची हाक देऊन राज्यकर्त्यांना यशवंतरावांच्या समाधीला स्पर्श न करून देण्याचाही इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. तर, पोलिसांनी शनिवारी सायंकाळच्या सुमारास भर बाजारपेठेतून जंगी संचलन करून ‘हम भी कुछ कम नही’ असेच चित्र रंगवले आहे.
मराठवाडय़ातही आंदोलनाचे लोण
औरंगाबाद/परभणी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या ऊसदर आंदोलनाचे लोण परभणी जिल्ह्यात पोहोचले. शुक्रवारी रात्री संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्’ाात ठिकठिकाणी ऊस वाहून नेणाऱ्या १५ ते २० वाहनांची हवा सोडून हेडलाईट व काचा फोडल्या. संघटनेच्या कार्यकर्त्यांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात दरोडय़ाचा गुन्हा दाखल झाला.  दुसरीकडे शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेतर्फे शनिवारी औरंगाबाद, परभणीसह मराठवाडय़ात ठिकठिकाणी पानफूल आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रवाशांना पानफूल व छापील पत्रक देऊन शेतकऱ्यांची कैफियत मांडली.
केंद्राकडून मदत हवी..
साखरेवरील आयात शुल्क वाढविणे, निर्यातीला अनुदान, इथेनॉल किंवा बफर स्टॉक आदी महत्त्वाच्या मुद्दय़ांवर केद्राकडून राज्याला मदतीता हात हवा आहे. नुसत अनुदान देऊन चालणार नाही तर त्यासाठी दीर्घकालीन उपायांची आवश्यकता असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. केंद्राने साखर उद्योगाला मोठे पॅकेज द्यावे, असा राज्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीत काहीच तोगडा निघाला नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांना ३००० रुपयांची पहिली उचल मिळाली पाहिजे यासाठी आंदोलन सुरूच राहिल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.