राज्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांना अपेक्षित दर देत नसल्याबद्दल आंदोलन होत असतानाच पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल ३३ कारखान्यांनी आपल्या विभागातील शेतकऱ्यांना तब्बल ३३७ कोटींचा दिवाळी बोनस दिला आहे. मात्र २८ कारखान्यांनी केलेल्या कराराप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिलेले नसल्याचेही स्पष्ट झाले असून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत.
गेल्या गळीत हंगामात राज्य सहकारी साखर कारखाना संघ आणि शेतकऱ्यांच्या संघटना यांच्यात विभागनिहाय ऊस दराबाबत सामंजस्य करार झाला होता. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्हयांसाठी २०५० पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्हयात १८५० आणि उर्वरित जिल्हयांसाठी १८०० रुपये असा भाव निश्चित करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात गळीत हंगामात साखरेला मिळालेला जास्त उतारा आणि वाढलेले भाव यामुळे साखर कारखान्यांना चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे ३३ कारखान्यांनी आपल्या विभागातील शेतकऱ्यांना करारापेक्षाही जास्त दर दिला आहे. सर्वाधिक दर देण्यात विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या भीमाशंकर कारखान्याचा नंबर लागत असून त्यांनी करारापेक्षा प्रतिटन ६०० रुपये अधिक दिले आहेत. तर अजित पवार यांच्या छत्रपती कारखान्याने ३०० रुपये जास्त दिले आहेत. याशिवाय कोल्हापूर विभागातील ११, पुणे-नगर विभागातील २२ कारखान्यानी आपल्या शेतकऱ्यांना बोनस दिला आहे.
 मात्र १० खासगी आणि २९ सहकारी अशा ३९ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ठरलेल्या दराप्रमाणे पैसै न देता त्यांची २४५ कोटींची फसवणूक केल्याचे मध्यंतरी आढळून आले होते. त्यानंतर या कारखान्यांवर कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिल्यानंतर काही कारखान्यानी ही थकित रक्कम शेतकऱ्यांना परत दिली. मात्र अजूनही २८ कारखान्यानी १२४ कोटी रुपये थकवले आहेत. त्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती, महात्मा, वैनगंगा आणि विदर्भ शुगर या चार कारखान्यानी १२ कोटी, सार्वजनिक बांधकाममंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गजानन कारखान्याने २ कोटी, रमेश आडासकर यांच्या अंबेजोगाई कारखान्याने ४.८५ कोटी, रजनी पाटील यांच्या व्ही. के पाटील कारखान्याने ४.५६ कोटी, खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या संत एकनाथ, के.के. वाघ या कारखान्यांकडे १० कोटी, तर नगरमधील गणेश, केदारेश्वर आणि बाबुराव तनपुरे या तीन कारखान्यांनी ६.४८कोटी रुपये शेतकऱ्यांना अद्याप दिले नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा