शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती खालावल्यामुळे राज्यातील सर्वच नेत्यांनी मातोश्रीकडे धाव घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेले ऊस दरवाढ आंदोलन फसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. परिणामी बाळासाहेबांच्या प्रकृतीच्या कारणाने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्यावरील दबावही वाढला आहे.
ऊसाला पहिली उचल तीन हजार रुपये मिळावी आणि रंगराजन समितीच्या शिफारशी त्वरित लागू कराव्यात, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व अन्य काही शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनात गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र होरळपळत आहे. या आंदोलनात आतापर्यंत दोन शेतकऱ्यांचा बळी गेला असून शेकडो शेतकऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. आंदोलकांनीही मोठय़ा प्रमाणात वाहने आणि एसटी गाडय़ांचे नुकसान केले असून एकूणच ऊस दरवाढ अंदोलनामुळे पश्चिम महाराष्ट्रातील जनजीवन पुरते ठप्प झाले आहे.
दिवाळीच्या निमित्ताने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दोन दिवसांपासून कराड मुक्कामी होते. या आंदोलनात राज्य सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून सातत्याने केली जात होती. मात्र या आंदोलनात मध्यस्थी केली तर उद्या कांदा, कापूस, सोयाबीनच्या दरावरून होणाऱ्या सर्वच आंदोलनांत राज्य सरकारच्या मध्यस्थीचा नवा पायंडा पडेल आणि त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरही भार पडेल. त्यामुळे ऊस दरवाढ प्रश्नापासून अलिप्त राहण्याची भूमिका राज्य सरकारने घेतल्याने या प्रश्नाची कोंडी अद्याप फुटू शकलेली नसल्याचे मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
सरकार आपल्या भूमिकेवर अडून बसल्याने आणि साखर कारखान्यांनी चर्चेऐवजी थेट कारखानेच काही काळ बंद ठेवण्याची भूमिका घेतल्यामुळे आंदोलनकर्ते हवालदिल झाले आहेत. त्यातच शिवेसनाप्रमुखांची प्रकृती अधिक खालावल्यामुळे मुख्यमंत्री, गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्यासह बहुतांश नेत्यांनी आंदोलनकर्त्यांकडे पाठ फिरवून थेट मातोश्रीकडे धाव घेतली. तसेच या आंदोलनात हस्तक्षेप न करण्याच्या आपल्या भूमिकेवर मुख्यमंत्री अडून राहिल्यामुळे पुढील काही दिवसात अशीच परिस्थिती राहिल्यास आंदोलनाची हवाच निघून जाण्याची भीती आता संघटनेच्या नेत्यांनाही वाटू लागली आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांनी जामीन घेण्याची तयारी दाखविण्याबरोबरच कार्यकर्त्यांनाही संयम राखण्याचे आवाहन करीत एक पाऊल मागे घेण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, सरकार आपल्या भूमिकेवर कायम असल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे बाळासाहेबांच्या खालावलेल्या प्रकृतीचे कारण पुढे करून हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत.
ऊस आंदोलन मागे घेतले जाणार?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती खालावल्यामुळे राज्यातील सर्वच नेत्यांनी मातोश्रीकडे धाव घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेले ऊस दरवाढ आंदोलन फसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. परिणामी बाळासाहेबांच्या प्रकृतीच्या कारणाने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्यावरील दबावही वाढला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-11-2012 at 01:57 IST
TOPICSसाखरेचे दर
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugar farmer will take there protest back