मुंबई : यंदाच्या गळीत हंगामात देशभरात उसाचा तुटवडा जाणवला. हंगाम उशिराने सुरू होऊन ही जेमतेम ७० – ८० दिवस गाळप करून कारखान्यांनी धुराडी बंद केली आहेत. १५ फेब्रुवारीअखेर देशातील ७७ कारखाने बंद झाले आहेत, त्यात राज्यातील २५ कारखान्यांचा समावेश आहे. आजअखेर देशभरात एकूण १९७ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाच्या गळीत हंगामात देशातील एकूण ५३१ कारखान्यांपैकी ४५४ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. गतवर्षी ५३३ पैकी ५०५ कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. गतवर्षाच्या तुलनेत यंदा गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांची संख्या ५१ ने घटली आहे. १५ फेब्रुवारी २०२५ अखेर यापैकी ७७ कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता झाली आहे, गतवर्षी याच काळात २८ कारखान्यांनी गाळप बंद केले होते. म्हणजे उसाचा तुटवडा असल्यामुळे सुरू झालेल्या कारखान्यांनी संख्या ही कमी होती आणि उसाच्या तुटवड्यामुळे बंद झालेल्या कारखान्यांची संख्याही जास्त असल्याचे चित्र आहे.

देशभरात १५ फेब्रुवारीपर्यंत २१७५ लाख टनाचे उस गाळप झाले आहे, जे गतवर्षीच्या तुलनेत १०२ लाख टनांनी कमी आहे. त्यामुळे साखर उत्पादनातही फटका बसला आहे. देशभरात १९७.६५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गतवर्षी या काळात २२४.७५ लाख टन साखर उत्पादन झाले होते.
सरासरी साखर उतारा केवळ ९.०९ टक्के मिळाला असून, तो गतवर्षीच्या ९.८७ टक्क्यांपेक्षा ०.७८ टक्क्यांने कमी आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थीचा परिणाम म्हणून यंदाच्या हंगामात निव्वळ साखर उत्पादन २७० लाख टनांपर्यंत सीमित राहण्याचा अंदाज आहे. गतवर्षी ३१९ लाख टन निव्वळ साखर उत्पादन झाले होते. राज्याचा विचार करता सोमवारपर्यंत राज्यात ७३९.४६ लाख टन उसाचे गाळप होऊन, ६८ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. कोल्हापूर विभागाने सर्वाधिक दहा लाख टन साखर उत्पादन घेतले आहे. राज्यातील २५ कारखाने बंद झाले असून, त्यात सोलापुरातील २१ आणि नांदेडमधील चार कारखान्यांचा समावेश आहे.

साखरेचे दर चढे राहणार

साखर उत्पादनात गतवर्षाच्या तुलनेत घट होणार आहे. त्यामुळे स्थानिक बाजारातील साखर विक्रीचा दर स्थिर आणि चढा राहण्याचा अंदाज आहे. केंद्र सरकारने किमान साखर विक्री मूल्य न वाढविताही साखरेचे दर चढे राहिल्यामुळे कारखान्यांना ऊस उत्पादकांची देणी भागविणे शक्य होईल. पण, साखरेच्या किमान विक्री दरात तसेच इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ झाल्यास कारखान्यांचे अर्थचक्र सुधारण्यास मदत होईल, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.