उसाला पहिली उचल तीन हजार रूपये देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेले आंदोलन पेटले असले तरी त्यात मध्यस्थी न करण्याचाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पवित्रा असेल असे दिसत आहे. शेट्टी आणि राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू झालेले समन्वयाचे राजकारण, त्यातच सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांच्यासारखी काँग्रेसविरोधी मंडळीही या आंदोलनात उतरल्यामुळे हे आंदोलन बेदखल करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यानी घेतली आहे. परिणामी शेट्टींचे हे आंदोलन फसण्याचीच लक्षणे दिसू लागली आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने छेडलेल्या आंदोलनास हिंसक वळण लागून दोन शेतकऱ्यांचा बळी गेल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी काही जिल्हयात बंदही पुकारला आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत ऊस दरवाढीच्या मुद्यावर हस्तक्षेप न करण्याची राज्य सरकारची भूमिका आणि  मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची खासदार शेट्टी यांची भूमिका यांमुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बुधवारच्या बंद दरम्यान पोलिसांनी संयम पाळावा, मात्र आंदोलन हिंसक होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना गृहविभागाने पोलिसांना दिल्या आहेत. त्यामुळे बुधवारच्या बंदवरूनच या आंदोलनची आणि सरकारची पुढील दिशा ठरेल अशी माहिती उच्च पदस्थ सूत्रांनी दिली.
 शेतकऱ्यांच्या या आंदोलनास देश पातळीवरून पाठिंबा मिळत असला तरी गेल्या काही महिन्यातील खासदार राजू शेट्टी यांच्या बदलत्या भूमिकेमुळे काँग्रेस आणि शेट्टी यांच्यातील संबंध मात्र दुरावले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सातत्याने टार्गेट करणाऱ्या खासदार शेट्टी यांनी अलिकडच्या काळात पवार यांच्याबाबत घेतलेल्या मवाळ भूमिकेमागे २०१४ च्या निवडणुकीची गणिते असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकावयास मिळते.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खासदार शेट्टी यांना पुन्हा महाराष्ट्रात परतण्याचे वेध लागले आहेत. राष्ट्रवादीला जिल्ह्यातील आपली गेलेली जागा परत मिळवायची असून त्यातूनच शरद पवार आणि शेट्टी यांच्यात समन्वयाचे राजकारण सुरू असून हातकणंगले लोकसभा मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राष्ट्रवादीला मदत करायची आणि त्या बदल्यात काँग्रेसच्या ताब्यातील शिरोळ विधानसभा मतदरासंघात राष्ट्वादीने शेट्टी यांना छुपा पाठिंबा द्यायचा असे उभयतामध्ये गुप्तगू झाल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मिळाल्यामुळेच त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचेही सूत्रांनी सांगितले.
 पवार यांनी शेट्टी यांच्यावर टीकास्त्र सोडले असले तरी त्याला अर्थ नाही. कारण आजवर पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकून राजकारण करणाऱ्या शेट्टी यानी यावेळी कोल्हापूर, सातारा आणि इंदापूर हाच आपल्या आंदोलनाचा केलेला केंद्रबिंदू आणि पवार यांच्याबद्दल घेतलेले नरमाईचे धोरण यातून सर्वकाही स्पष्ट होते असेही काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले.    

Story img Loader