सर्व समाजघटक एकत्र आणण्यावर भर देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऊस आंदोलनाला जातीय रंग दिल्याबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सारे साखर कारखानदार आपल्याबरोबर राहतील तसेच शेट्टी यांनी पुढील निवडणुकीत रोखणे हा पवार यांचा दुहेरी उद्देश यामागे असण्याची शक्यता आहे.  
शेट्टी यांच्या समाजाचे कारखाने सुरू आहेत पण बाकीचे बंद पडत आहेत, शेतकऱ्यांची जात वेगळी, अशा स्वरूपाची विधाने शरद पवार यांनी आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर सोमवारी केली होती. राज्यातील अनेक नेते जातीय भूमिका किंवा जातीय वक्तव्ये करण्यासाठी प्रसिद्ध असले तरी पवार यांनी उघडपणे आतापर्यंत कधीच जातीय रंग दिला नव्हता. खासदार शेट्टी हे जैन समाजाचे असून, शेतकऱ्यांची जात वेगळी, असे सांगत पवार यांनी जैन, लिंगायत विरुद्ध मराठा अशी विभागणी करण्याचा प्रयत्न केला आहे. बहुजन समाजाने शेट्टी यांची साथ करू नये, असाच सूचक इशारा पवार यांनी दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते नेहमीच मराठा राजकारणाचा सोयीस्कर पद्धतीने उपयोग करून घेतात, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.   २००४च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी लेनच्या पुस्तकाचा मुद्दा उचलून राष्ट्रवादीने मराठा मतांचे ध्रुवीकरण केले होते. २००९च्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे करण्यात आला होता, पण तो यशस्वी ठरला नाही.
शरद पवार यांच्या अलीकडच्या भूमिकेबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. कधीही घटनात्मक पदांवरील व्यक्तींवर टीकाटिप्पणी वा विरोधात बोलण्याचे टाळणाऱ्या पवार यांनी दुष्काळावरून राज्यपाल के. शंकरनारायण यांच्यावर टीका केली होती. यापाठोपाठ आंदोलनाला उघडपणे जातीय रंग दिला.
हातकणंगले या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात गेल्या निवडणुकीत शेट्टी हे निवडून आले होते. राष्ट्रवादीच्या विरोधात तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी शेट्टी यांना सारी रसद पुरविली होती. आतरयत राष्ट्रवादीला लक्ष्य करणारे खासदार शेट्टी यांनी यंदा काँग्रेसला लक्ष्य केले. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्याच्या विरोधात आंदोलन केले. इंदापूरमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले. शेट्टी यांनी एकाच वेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची नाराजी ओढावून घेतली आहे.     

    

Story img Loader