महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटायला गेले असताना तेथील मंत्रालयाच्या लिफ्टबाबत एक निरिक्षण नोंदवलं आहे. तसेच त्याचा संदर्भ देत महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला एक सल्लाही दिला आहे. पश्चिम बंगालच्या मंत्रालयाचा दरवाजा उघडला की लगेच तेथे किशोर कुमार यांची बंगालीतील गाणी लागतात. महाराष्ट्रातील मंत्रालयात देखील लता दीदींची, आशा ताईंची, पंडितजींची गाणी लागायला पाहिजे, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर यांना झी २४ तासकडून अनन्य सन्मान जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. यावेळी राज ठाकरे बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरे म्हणाले, “खरंतर महाराष्ट्र राज्याने पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या लोकांना उचलून धरलं पाहिजे. सांस्कृतिक गोष्ट काय असते, सांगितीक गोष्ट काय असते? मी मध्यंतरी ममता बॅनर्जी यांना भेटायला पश्चिम बंगालच्या मंत्रालयात गेलो होतो. मी त्या मंत्रालयाच्या वास्तूत गेलो, लिफ्टचा दरवाजा उघडला आणि पश्चिम बंगालच्या मंत्रालयाच्या लिफ्टमध्ये किशोर कुमार यांची बंगालीतील गाणी लागली. जो कोणी माणूस आमच्या मंत्रालयात येईल, तो कोणत्याही भाषेचा असेल त्याच्या कानावर पहिल्यांदा बंगाली भाषा गेली पाहिजे.”

“महाराष्ट्राच्या मंत्रालयात लिफ्टमध्ये लता दीदींची कानावर पडली पाहिजे”

“किशोर कुमार यांच्यासारखी व्यक्ती पश्चिम बंगालमध्ये जन्माला आल्यानंतर पश्चिम बंगाल सरकारने तो निर्णय घेतला. खरंतर महाराष्ट्राच्या मंत्रालयात लिफ्टमध्ये लता दीदींची, आशा ताईंची, पंडितजींची गाणी लागायला पाहिजे. जो येईल त्याच्या कानावर ही गाणी पडली पाहिजे,” असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

“ही सगळी मंडळी देशात नसती तर या देशात कधीच अराजक आलं असतं”

“या देशात कलाकार, संगीतकार, गायक, नाट्यक्षेत्र, साहित्य, कवी, चित्रपट ही सगळी मंडळी देशात नसती तर या देशात कधीच अराजक आलं असतं. आपण या लोकांमध्ये गुंतून पडलो, आपण यांच्यावर प्रेम केलं, आपण त्यांच्यात आत शिरलो म्हणून इतर वाईट गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष झालं. या लोकांचे आभार मानावे तर कसे मानावेत हेच मला समजत नाही. मी अनेकदा मंगेशकरांची गाणी ऐकत असतो. इतकी विविध गाणी मराठीत कोणी दिली असतील असं मला वाटत नाही. हिंदीत पण मोजकेच,” असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

“…तो अल्लाह एखाद्या मुसलमानाला देखील लावता येणार नाही”

राज ठाकरे म्हणाले, “मी जेव्हा शिवतीर्थावर दीदींचा एक कार्यक्रम केला तेव्हा दीदी आणि पंडीतजी दोघांनी ‘रसलुल्ला’ ही एक बंदीश गायली होती. मी आजही ठामपणे सांगू शकतो की रसलुल्लामध्ये पंडीतजी ज्यावेळी अल्लाह लावतात तो अल्लाह एखाद्या मुसलमानाला देखील लावता येणार नाही इतका शुद्ध अल्लाह पंडितजींकडून लागला गेला होता. त्याला सूर लागणं म्हणतात.”

हेही वाचा : “नितीन गडकरी देशात खूप मोठमोठे प्रकल्प करतात, त्यांनी आता…”, राज ठाकरेंकडून ‘ही’ मागणी

“मी त्यांच्याकडून अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. सूर कसा लागतो, सूर कसा असतो, नेमका सूर कसा असतो,” असं म्हणत राज ठाकरे यांनी पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या कर्तुत्वाबद्दल गौरवोद्गार काढले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suggestion by raj thackeray to thackeray government over lata mangeshkar memories pbs