मुंबई : नरिमन पॉइंट परिसरातील मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर सोमवारी दुपारी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीवर मरिन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या भावाची हत्या झाली असून त्याप्रकरणी संशयितांची नावे देऊनही त्यांना अटक झाली नसल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे चौकशीत उघड झाले आहे. याप्रकरणी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला व्यक्तीला नोटीस देऊन सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा – “एकनाथ शिंदेंना उडवणार आहे”, मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, मुंबईतील एक जण अटकेत
अशोक चौरे (५०) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी मंत्रालयाच्या गार्डन मुख्यालयाजवळ अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्यांना ताब्यात घेतले. चौरे पुण्यातील बाणेर येथे राहतात. जालना येथील रामसगावमधील ते मुळ रहिवासी आहेत. त्यांचा भाऊ काशिनाथ चौरे (४४) यांची हत्या झाली होती. त्याप्रकरणी अशोक चौरे यांनी सहा संशयितांची नावे पोलिसांना सांगितली होती. पण अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. त्यामुळे आपण आत्महत्याचे प्रयत्न केल्याचे चौरे यांनी चौकशीत सांगितले. त्यांना फौजदारी दंड संहिता कलम ४१ (अ) (१) अंतर्गत नोटीस देऊन सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.