कांदिवली येथे वास्तव्यास असलेल्या ममता चौरसिया (२६) यांनी बुधवारी राहत्या घरी गळाला फास घेऊन आत्महत्या केली. हुंड्यासाठी पती आणि सासऱ्याकडून सतत होणार्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून ममताने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी केली. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच आरोपी पती अशोककुमार चौरसिया आणि सासरे अर्जुनप्रसाद चौरसिया या दोघांनाही कांदिवली पोलिसांनी अटक केली.
ममता मूळच्या उत्तर प्रदेशातील रहिवाशी होत्या. त्यांचे आई – वडील तेथेच वास्तव्यास असून मोठा भाऊ जितेंद्र चौरसिया कांदिवली परिसरात राहतो. तक्रारीनुसार, जून २०१९ रोजी ममताचा उत्तर प्रदेशात अशोककुमारसोबत दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने विवाह झाला. अशोककुमारने केलेल्या मागणीनुसार ममताच्या कुटुंबियांनी त्यांना सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इतर साहित्य दिले होते. दोन वर्षांपूर्वी ममता पतीसोबत मुंबईत आली होती. कांदिवलीतील गौसिया मशिदीजवळील जनता कॉलनीतील भाड्याच्या खोलीत ते दोघे राहात होते. त्या खोलीची अनामत रक्कम व भाडे तिचा भाऊ जितेंद्र देत होता.
हेही वाचा- “गिरीश बापटांनी कसब्याचा गड मजबूत केला, त्यांचा शब्द…”, देवेंद्र फडणवीस व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले…
लग्नात हुंडा दिल्यानंतरही अशोककुमार व त्याचे वडील अर्जुनकुमार यांच्याकडून ममताचा हुंड्यासाठी छळ सुरू होता. तिच्याकडे ते दोघेही सतत पैशांची मागणी करीत होते. माहेरून पैसे आणले नाही तर तिला शिवीगाळ आणि मारहाण करण्यात येत होती. बहिणीला त्रास होऊ नये म्हणून जितेंद्र आणि त्याचे कुटुंबिय त्यांना नेहमीच आर्थिक मदत करीत होते. दरम्यानच्या काळात ममताला मुलगी झाली. मुलीवरून नंतर पती व सासरा तिला सतत टोमणे मारत होते. पैशांवरून सतत या दोघांमध्ये वाद सुरू होते. सततच्या वादाला, तसेच हुंड्यासाठी होणार्या छळाला ममता कंटाळली होती. यामुळे आलेल्या नैराश्यातून बुधवारी सकाळी ६ वाजता ममताने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.