मुंबई : राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. करीर यांच्या निवृत्तीनंतर राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे. सेवाज्येष्ठतेनुसार (१९८७च्या तुकडीतील) गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार (१९८८) आणि मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल (१९८९) हे मुख्य सचिवपदाचे दावेदार मानले जात आहेत.
हेही वाचा >>> करोना काळात महापालिकेचे बनावट ओळखपत्र वापरल्याचा आरोप; उच्च न्यायालयाकडून एका महिलेसह दोघांविरोधातील गुन्हा रद्द
सौनिक यांची मुख्य सचिव पदाची संधी दोन वेळा हुकली होती. मात्र या वेळी राज्याच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकाऱ्यास मुख्य सचिवपदी संधी देऊन सरकार महिलांचा सन्मान करीत असल्याचा संदेश देण्याचा महायुतीचा मानस असल्याचे सांगण्यात येते. सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव असल्याने मुख्य सचिवपदाचा बहुमान प्रथमच महिला अधिकाऱ्याला मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ‘आयुष्यात कठीण परिस्थितीत मध्यम मार्ग साधता आला पाहिजे. मी तसाच प्रयत्न करतो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सर्वांनी तसा प्रयत्न करावा,’ असे आवाहन करीर यांनी शुक्रवारी येथे केले. शनिवारी सेवानिवृत्त होत असलेल्या करीर यांना मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या वतीने निरोप देण्यात आला.