मुंबई : मुंबईतील १९९२-९३ सालच्या दंगलीदरम्यान सुलेमान उस्मान बेकरीवर झालेल्या गोळीबारप्रकरणी बेकरीच्या ७५ वर्षांच्या मालकाची विशेष न्यायालयात साक्ष नोंदवण्यात आली. मात्र घटनेला एवढी वर्षे उलटल्याने आपल्याला काहीच आठवत नसल्याचे त्याने सांगितल्याने तपास यंत्रणेच्या विनंतीवरून सत्र न्यायालयाने बेकरीच्या मालकाला फितूर घोषित केले.

बेकरीचे मालक सुलेमान मिठाईवाला यांना व्हीलचेअरवरून साक्ष देण्यासाठी न्यायालयात आणले गेले होते. पोलिसांच्या आरोपानुसार ९ जानेवारी १९९३ रोजी बेकरीत घुसून पोलिसांनी नि:शस्त्र मुस्लिमांवर गोळीबार केला होता. यात आठ जणांचा मृत्यू झाला आणि १२ जण जखमी झाले. तत्कालीन सहपोलीस आयुक्त राम देव त्यागी यांना या प्रकरणी आरोपी करण्यात आले होते. नंतर त्यांच्यासह आठजणांना प्रकरणातून दोषमुक्त करण्यात आले. त्यागी यांच्या सांगण्यावरून हा गोळीबार करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यागी यांचे २०२० मध्ये निधन झाले.

हेही वाचा >>> ‘पीएफआय’ हे ‘सिमी’चेच प्रतिरूप? बंदीबाबत महाराष्ट्र एटीएसही आग्रही होते!

बेकरीतून पोलिसांवर गोळीबार झाला आणि परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला असा आरोपींचा दावा आहे. सुरुवातीला या प्रकरणी १७ पोलिसांना आरोपी करण्यात आले होते. मात्र सद्यस्थितीला केवळ सात पोलिसांवर खटला सुरू आहे. बेकरीमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत आपल्याला फोन आल्याची माहिती मिठाईवाला यांनी त्यावेळी पोलिसांना दिली होती. दंगलीच्यावेळी लागू असलेल्या संचारबंदीमुळे ते घरीच होता. तसेच घटनेनंतर तीन दिवसांनी त्यांनी जेजे रुग्णालयातून त्यांच्या कामगारांचे मृतदेह ताब्यात घेतल्याचे मिठाईवाला यांनी पोलिसांना सांगितले होते.

Story img Loader