आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले माजी लोकसभाध्यक्ष मनोहर जोशी यांचे लक्ष असलेल्या दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातच गणेशोत्सवाच्या काळात स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांचे भव्य फलक फडकल्यामुळे अस्वस्थ जोशी सरांनी बुधवारी थेट मातोश्री गाठून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच विचारणा केली. मात्र अद्यापि आपण कोणताही उमेदवार निश्चित केलेला नाही अशी समजूत काढून उद्धव यांनी जोशी यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे सेनेच्या सूत्रांचे म्हणणे आहे. दक्षिण-मध्यमधून उमेदवारी मिळणार नसेल तर ठाण्यासाठी विचार करावा असे सांगून अखेर मनोहर जोशी ‘मातोश्री’वरून परतले.
महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा दादरचा बालेकिल्ला मनसेने हस्तगत केला. दादरमधील सातही जागा मनसेने सेनेकडून हिसकावून घेतल्यामुळे शिवसेना नेतृत्व मनोहर जोशी यांच्यावर कमालीचे नाराज आहे. गेल्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुखांनी आपल्या भाषणात (चित्रफीत) दादरचा बलेकिल्ला पडल्याची खंत व्यक्त केली होती. त्यानंतरही दादरसाठी अथवा दक्षिण-मध्य मुंबईत मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली कोणते विशेष कार्यक्रम झाले नाही की मनसेच्या विरोधात त्यांनी कधी आवाजही उठवला नाही. त्यानंतर गणेशोत्सवाच्या काळात दादरमध्ये स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांची भव्य होर्डिग्ज लावण्यात आली. त्यावर केवळ शेवाळे, उद्धव व आदित्य ठाकरे यांचीच छायाचित्रे होती आणि विभागप्रमुख म्हणून सदा सरवणकर यांचे नाव होते. शेवाळे यांच्या एकाही होर्डिगवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी लोकसभा अध्यक्ष असलेल्या शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे साधे नावही टाकण्यात आले नव्हते. विशेष म्हणजे दादरमधील शिवसैनिकदेखील याला आक्षेप घेत जोशी यांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. शिवसैनिकांनाही मनोहर जोशी पसंत नाहीत असाच याचा अर्थ असल्याचे सेनेच्या सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र मनोहर जोशी हे निवडणूक लढविण्यास इच्छुक असून त्यांनी बुधवारी उद्धव यांची भेट घेऊन दोन तास चर्चा केली.
राहुल शेवाळे यांना होर्डिग्ज लावण्यास परवानगी दिल्याचे उद्धव यांनी आपल्याला सांगितले असून अद्यापि कोणाचीही उमेदवारी निश्चित केली नसल्याचेही मनोहर जोशी यांनी पत्रकारांना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा