मुंबई : मुंबईत सतत तीन दिवस उन्हाने अंगाची काहिली झाली आहे. उकाडा आणि उन्हाचे चटके यांमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. दरम्यान, सोमवारपासून कमाल तापमानात काही अंशांनी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे उन्हापासून काहीसा दिलासा मिळणार आहे.
मागील काही दिवस मुंबईकरांना उन्हाचा प्रचंड त्रास झाला. सलग तीन दिवस मुंबईच्या तापमानाचा पारा ३६ अंशापार गेला होता. त्यात शनिवारी काहीशी घट झाली. परंतु सध्या दुपारच्या कडकडीत उन्हाच्या झळा जाणवत आहेत. ऋतुबदलाच्या या काळात सध्या पहाटे मात्र गारवा जाणवत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात आज २१ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात १७.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दरम्यान, सोमवारपासून किमान तापमानात आणखी घट होऊन वातावरणात सकाळी गारवा निर्माण होऊ शकतो. तसेच कमाल तापमानातही काही अंशांनी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मागील काही दिवसांपासून मुंबईतील किमान तापमानात घट होत असली तरी कमाल तापमान मात्र चढेच आहे. विषम हवामानामुळे आरोग्याच्या तक्रारींना तोंड द्यावे लागत आहे. सध्या दुपारी पूर्वेकडून वारे येत असल्यामुळे तापमानाचा पारा चढा आहे. त्याचबरोबर सायंकाळी उत्तरेकडून वारे येत असल्याने रात्री आणि पहाटे गारवा जाणवत आहे अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी दिली.
जानेवारी महिन्यात देखील तापमानाचा पारा चढाच होता. कमाल आणि किमान तापमानात प्रचंड फरक असल्याने मुंबईकरांना उकाड्याला सामोरे जावे लागत होते. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात ३ जानेवारीला ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हा दिवस जानेवारीमधील सर्वाधिक उष्ण दिवस ठरला. या कालावधीत संपूर्ण दिवस उष्ण झळांचा सामना मुंबईकरांनी केला. उष्ण वारे नागरिकांनी अनुभवले. तसेच वातावरणातील आर्द्रता अधिक असल्याने त्याचा परिणामही जाणवला.
मुंबईचा पारा सलग तीन दिवस ३६ अंशापार
मुंबईत गुरुवारपासून असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. गुरुवारपासून शनिवारपर्यंत सलग तीन दिवस मुंबईचे कमाल तापमान ३६ अंशापार गेले होते. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३२.९ , तर सांताक्रूझ केंद्रात ३६.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तसेच शनिवारी कुलाबा केंद्रात ३२.४, सांताक्रूझ केंद्रात ३६.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. यामुळे सलग तीन दिवस मुंबईकर उष्णतेमुळे हैराण झाले.
राज्यातील इतर भागातही तापमानाचा पारा चढा आहे. सरासरीपेक्षा अनेक भागात ३ ते ४ अंशांनी अधिक तापमान नोंदले जात आहे. शनिवारी सोलापूर येथे सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. तेथील तापमान ३७.८ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.