सुखद गारवा आणणारा आणि त्यामुळेच हवाहवासा वाटणारा हिवाळा आता मुंबईकरांचा निरोप घेत आहे. उन्हाळ्याला सुरुवात होत असून बुधवारच्या कमाल ३४.३ अंश सेल्सिअसने त्याची नांदी केली. यानंतर तापमान तातडीने वाढणार नसले तरी गुलाबी थंडीची मजा अनुभवण्यासाठी मात्र पुढच्या हिवाळ्याची वाट पाहावी लागेल.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट होण्याचा धोका अजूनही कायम आहे. मुंबईसह कोकणात मात्र आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. बुधवारी दुपारी मुंबईसह ठाणे परिसरात उन्हाच्या झळांनी लोकांना बेजार केले. मंगळवापर्यंत ३० अंशांच्या घरात राहणारे दुपारचे तापमान बुधवारी थेट चार अंशांनी वाढले. पुढील दोन दिवसांत हे तापमान दोन अंशांनी खाली उतरणार असल्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने व्यक्त केला आहे. मात्र तरीही गारठा परतून येण्याची शक्यता आता नाही. उन्हाळ्याची सुरुवात होत असून काही दिवसांनंतर त्याची तीव्रता वाढेल, अशी माहिती वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, मार्चमधील टोकाच्या हवामानाचा अनुभव येण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी किमान तापमान २० अंश सेल्सिअसखाली गेले होते. त्यानंतर लगेचच बुधवारी तापमानाने दुसरे टोक गाठले. ‘मार्चमधील हवामानाचे हे वैशिष्टय़ आहे. मार्च हा थंडी व उन्हाळा यांच्यामधील स्थित्यंतराचा काळ असतो. गेल्या काही वर्षांतील सांख्यिकी पाहिली असता मार्चमध्ये सर्वात कमी तापमान १२ अंशांदरम्यान तर कमाल तापमान ४०-४१ अंश सेल्सिअसपर्यंत जात असल्याचे दिसते. त्यामुळे यावेळीही तसे अनुभवायला आल्यास आश्चर्य वाटायला नको,’ असे मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या महिन्यातील आतापर्यंतचे सर्वात
किमान तापमान – १६ अंश से. (२ मार्च)
कमाल तापमान – ३४.८ अंश से. (१२ मार्च)
कमाल तापमानाचा प्रवास
१२ मार्च – ३४.३
११ मार्च- ३०.५
१० मार्च – ३०.३
९ मार्च – ३२.८
८ मार्च – ३०.६
७ मार्च – २९.८

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Summer season started in mumbai