मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही जादा बसगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत दररोज लांबपल्ल्याच्या ७६४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्याच्या सुट्टीत १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत एसटीतर्फे नियोजित फेऱ्यांव्यतिरिक्त जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. स्थानिक पातळीवर शटल सेवा आणि जवळच्या फेऱ्या संबंधित आगारातून चालविण्यात येतात. परंतु उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी लांबपल्ल्याच्या बससाठी मागणी वाढते. त्यासाठी या काळात शालेय फेऱ्या रद्द करून त्याऐवजी लांबपल्ल्याच्या फेऱ्या सुरू केल्या जातात.
जादा गाड्यांचे आरक्षण सुरू
उन्हाळ्याची सुट्टी लक्षात घेऊन प्रवाशांची गर्दी होणाऱ्या मार्गांवर १५ एप्रिल २०२५ पासून टप्याटप्याने बसगाड्यांच्या जादा फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने या काळात राज्यातील विविध मार्गांवर ७६४ जादा बस फेऱ्या चालविण्यास मंजुरी दिली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीतील जादा बसगाड्यांचे तिकीट आरक्षण संगणकीय पद्धतीने उपलब्ध करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ, मोबाइल ॲप, एसटी महामंडळाच्या बसस्थानकांवरील आरक्षण केंद्रांवर जादा बसगाड्यांचे आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रवाशांनी उन्हाळ्याच्या सुट्टीतील प्रवासाचे नियोजन करून महामंडळाच्या जादा बसगाड्यांच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
परिवहन मंत्र्यांच्या सूचना
एसटी महामंडळाची राज्यभरात ८४२ ठिकाणी १,३६० हेक्टर जमीन उपलब्ध आहे. त्याचे शहरी, निम-शहरी आणि ग्रामीण असे वर्गीकरण करण्यात आले आहे. राज्यातील बस स्थानके अत्याधुनिक सेवा-सुविधायुक्त करण्यासाठी ‘बांधा वापरा हस्तांतरित करा’ या तत्वावर विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ किंवा खासगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर या जमिनी विकसित करून तेथे एसटी महामंडळाला आवश्यक असलेली बस स्थानके, आगार आणि आस्थापना कार्यालय संबंधित विकासकाकडून बांधून घेणे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी किमान १०० खाटांचे अद्ययावत रुग्णालय, विद्युत बस चार्जिंग स्थानक, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सौरऊर्जा प्रकल्पांसारखे पर्यावरण पूरक प्रकल्प उभारण्याचे नियोजित आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग सावंतवाडी व अंबोली, या बसस्थानकांचा विकास, तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड बस स्थानकावर प्रवाशांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानक अत्याधुनिक बसपोर्ट उभारण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत.