मुंबई : मुंबईत काही दिवसांपासून उन्हाचा ताप जाणवू लागला असून मंगळवारपर्यंत मुंबईचे तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सांताक्रूझ येथे कमाल तापमान रविवारी ३७.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तापमानातील वाढीबरोबरच वाढत्या आद्रतेमुळे उष्मा अधिक प्रमाणात जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी ३५ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात ३७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथील तापमान ५.९ अंशांनी अधिक नोंदले गेले. मुंबईच्या किमान तापमानातही गेल्या दोन दिवसांपासून वाढ होत आहे. सलग तिसऱ्या दिवशी मुंबईचा पारा ३७ अंशापेक्षा वर गेला. मुंबईकरांना रविवारी उन्हाचा ताप जाणवला. ही काहिली आणखी काही दिवस सहन करावी लागेल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, हा बदल ऋतुमानानुसार होत असून अजून उन्हाळ्याचे राज्यात आगमन झालेले नाही असेही हवामान विभागाने सांगितले. वाऱ्यांची दिशा बदलली आहे. सध्या पूर्व दिशेकडे वारे वाहत आहेत. या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात वाढ झालेली आहे. उष्ण वारे आणि आर्द्रता यामुळे उकाडा अधिक जाणवत आहे.फेब्रुवारीत साधारणपणे मुंबईचे सर्वाधिक कमाल तापमान ३६ ते ३८ अंशांपर्यंत पोहोचते. फेब्रुवारीच्या मध्यानंतर तापमानवाढ व्हायला सुरुवात होते. फेब्रुवारीचा दुसरा पंधरवडा आणि मार्चचे पहिले काही दिवस तापमानामध्ये चढउतार होत राहतात. एकाएकी तापमानाचा पारा वर चढतो, मात्र त्यानंतर तापमान चढेच राहील, असे नसते. ते अचानक कमीही होते. मात्र हिवाळ्यासारखा दिलासा आता पुढील काही महिने अनुभवता येणार नसल्याचे हवामान विभागाने सांगितले. मुंबईला अरबी समुद्राचे सान्निध्य असल्याने पारा सतत चढता नसतो. समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे सायंकाळी तापमानात काहिशी घट होते.
दरम्यान, सध्या मुंबईचे सकाळचे म्हणजेच किमान तापमानही सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी अधिक असल्याची नोंद झाली आहे. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी अजूनही गारठा जाणवत असून किमान तापमान १२ ते १५ अंशा दरम्यान आहे. राज्यात रविवारी सर्वाधिक म्हणजे ३७.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान सोलापूर येथे नोंदले गेले. तर सर्वात कमी किमान तापमान जळगाव येथे १४ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
पुढील दोन पारा चढाच…
मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारपर्यंत उष्ण व दमट वातावरणाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यानुसार अनेक भागात दिवसभर असह्य उकाडा सहन करावा लागेल. यावेळी वाऱ्याचा वेग साधारणच राहील. काही भागात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, मध्य विदर्भ, पूर्व विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत गुरुवारपर्यंत काही भागांत हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.