मुंबई : ‘इंडियाज गॉट लेटंट’ या कार्यक्रमावरून सुरू झालेल्या वादात महाराष्ट्र सायबर विभागाने गुन्हा दाखल केल्यानंतर आतापर्यंत ५० हून अधिक जणांना समन्स बजावले आहे. त्यात बहुतांश सेलिब्रेटी असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांचे जबाब नोंदवले आहेत.

महाराष्ट्र सायबर विभाग इंडियाज गॉट लेटंटच्या १ ते ६ सर्व भागांची तपासणी करत आहेत. या प्रकरणी ३० हून अधिक व्यक्तींना आरोपी करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राखी सावंत, समय रैनासह ५० नामवंत सेलिब्रेटींना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहे. तपासादरम्यान, परीक्षकांनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आर्थिक मोबदला मिळाल्याचा कोणताही ठोस पुरावा सायबर विभागाला अद्याप सापडलेला नाही. पण त्या दृष्टीनेही तपास करण्यात येत आहे. तसेच काही व्यक्तींनी दिलेल्या जबाबानुसार हा कार्यक्रम हास्यकलाकार समय रैना याच्या निर्देशानुसार चालवला जात होता, असे आरोप करण्यात आले आहेत. तसेच कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांकडून जमा झालेली रक्कम थेट त्या भागाच्या विजेत्याला दिली जात होती, अशी माहिती मिळाली आहे. तसेच येत्या काही दिवसांत आणखी व्यक्तींना समन्स बजावण्याची शक्यता आहे.

समन्स बजावण्यात आलेले सर्वच आरोपी नाहीत. पण आम्ही सर्वच भागांची तपासणी करत आहोत. त्यानुसार त्या व्यक्तींना बोलावून आरोेपींची पडताळणी करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी खार पोलिसांनी प्राथमिक चौकशीला सुरुवात केली असून रणवीर अलाहबादियाला चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

अलाहबादियाने वादग्रस्त वक्तव्य नुकत्याच झालेल्या ‘इंडियाज गॉट लेटंट’ या कार्यक्रमाच्या एका भागात केले होते. त्यात तो परीक्षक म्हणून उपस्थित होता. त्याच्यासह इतर लोकप्रिय कंटेंट क्रिएटर्स आशिष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा मुखीजाही होते. अलाहबादियाने केलेल्या वक्तव्यामुळे त्याच्यावर समाजमाध्यमांवर टीका झाली. मुंबई पोलिसांनीही या प्रकरणी रणवीर व समय यांच्यासह सहा जणांना चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यातील रणवीर व समय अद्याप चौकशीसाठी उपस्थित राहिलेले नाहीत.

Story img Loader