अभिनेता संजय दत्त याच्या सांगण्यावरून धमकी दिल्याच्या आरोपाखाली निर्माता शकील नुरानी यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी अंधेरी न्यायालयाने दत्त याला समन्स बजावत १ मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
नुरानी यांच्या ‘जान की बाजी’ या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण होण्याआधीच संजय त्यातून बाहेर पडला. २००२ मध्ये घडलेल्या या प्रकारानंतर संजयने चित्रिकरण पूर्ण करण्याबरोबरच नुरानी यांनी दिलेले ५० लाख रुपये देण्यासही नकार दिला. तेव्हापासून या दोघांमध्ये ही लढाई सुरू आहे.
न्यायालयाने नुरानी यांच्या तक्रारीची दखल घेत संजयला न्यायालयात हजर राहून त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत.
नूरानी यांनी आधी ‘इंडियन मोशन पिक्चर प्रोडय़ुसर असोसिएशन’कडे धाव घेतली होती. त्यावेळी असोसिएशनने संजयला नुरानी यांना कोटय़वधीचे नुकसान केल्याप्रकरणी दोन कोटी रुपये देण्याचे आदेश दिले होते. परंतु संजयने त्यावेळी पैसे न दिल्याने अखेर नुरानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाने नूरानी यांच्या याचिकेची दखल घेत संजयच्या नावे असलेल्या दोन मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. परंतु त्यानंतर संजयने आपल्याला अंडरवर्ल्डच्या माध्यमातून धमकावण्यास सुरुवात केल्याचा आरोप करीत नुरानी यांनी संजयविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा