विविध अभियांत्रिकी कामांसाठी रविवार, १८ सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेवर सीएसएमटी-विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ या काळात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच ठाणे-वाशी, नेरुळ ट्रान्स हार्बरवर दोन्ही मार्गांवर ब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेनेही चर्चगेट – मुंबई सेंट्रलदरम्यान दोन्ही जलद मार्गांवर मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सीएसएमटी येथून रविवारी सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे पुन्हा डाउन मार्गावर वळविण्यात येतील. घाटकोपर येथून रविवारी सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ या काळात सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील लोकल विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार असल्याने लोकल कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.
हेही वाचा : मुंबई-ठाण्यात रुद्रवर्षां ; मोसमातील सर्वाधिक पाऊस; आणखी एक दिवस जोर कायम
ट्रान्स हार्बरवर ठाणे-वाशी, नेरुळ अप आणि डाउन मार्गावर रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत वाशी, नेरुळ, पनवेलसाठी सुटणाऱ्या लोकल आणि वाशी, नेरुळ, पनवेल येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्यासाठी सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत.दरम्यान, पश्चिम रेल्वेवरही चर्चगेट-मुंबई सेंट्रल दरम्यान दोन्ही जलद मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत दोन्ही जलद मार्गांवरील लोकल चर्चगेट-मुंबई सेंट्रल दरम्यान धीम्या मार्गावरून धावतील.