लोकसत्ता प्रतिनिधी

जुन्या गाजलेल्या नाटकांना पुनरुज्जीवित करत नव्याने प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयोग मराठी रंगभूमीसाठी नव्या नाटकांइतकाच यशस्वी ठरला आहे. तीस-चाळीस वर्षांपूर्वीची नाटकं, त्यातील कथाविषय कितीही जुने असले तरी नव्या संचात सादर होणाऱ्या जुन्या नाटकांनाही मराठी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. पु.लं.च्या लेखणीतून उतरलेले आणि लोकांच्या पसंतीस उतरलेले ‘सुंदर मी होणार’ हे नाटकही तब्बल तीस वर्षांनी नव्या कलाकारांच्या संचात रंगभूमीवर येते आहे. या नाटकाच्या निमित्ताने अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री शृजा प्रभुदेसाई प्रथमच एकत्र काम करणार आहेत.

‘पुलं’चा २५ वा स्मृतिदिन आणि ज्येष्ठ साहित्यिका सुनीताबाई देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष या दोन्हींचे औचित्य साधत ‘सुंदर मी होणार’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे. ‘सवाईगंधर्व’ निर्मित ‘अभिजात’ प्रकाशित या नाटकाची दिग्दर्शकीय धुरा राजेश देशपांडे सांभाळणार आहेत. या नाटकाचा मुहूर्त अभिनेत्री नयना आपटे, पु. ल. देशपांडे यांचे पुतणे जयंत देशपांडे आणि अभिनेते प्रदीप वेलणकर यांच्या उपस्थितीत झाला.

‘अनेक अजरामर नाट्यकलाकृती स्मरणरंजनाच्या, पुन:प्रत्ययाच्या आनंदाबरोबरच काही तरी विचार देऊ पाहण्याच्या उद्देशाने नव्याने रंगभूमीवर येत असतात. याच मांदियाळीतलं पु. ल. देशपांडे यांच्या लेखणीतून सजलेलं नाट्यकृतीतलं एक सुंदर पान उलगडलं जात आहे’, असं सांगत दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी आनंद व्यक्त केला.

‘पुलं-सुनीताबाई या जोडीने एकत्रित भूमिका केलेलं एकमेव नाटक म्हणजे ‘सुंदर मी होणार’. त्यामुळे या नाटकाचे प्रयोग करून या दोघा ज्येष्ठ कलावंतांना मानवंदना द्यावी, या उद्देशाने नाटकाची निर्मिती केल्याचे करण देसाई आणि आकाश भडसावळे यांनी सांगितले.