राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जुलै महिन्यापासून उभी फूट पडली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडले आहेत. अजित पवार यांनी भाजपासह जात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह दिग्गज नेते अजित पवारांसह गेले आहेत. आता लोकसभा निवडणुकीचं घोडामैदानही जवळ आलं आहे. अशात मंत्रालयाबाहेर लागलेल्या बॅनरची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांना उमेदवारी?

शरद पवार गटाला धोबीपछाड देण्यासाठी अजित पवार गट सुनेत्रा पवारांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मंत्रालयाबाहेर लागलेला बॅनर. या परिसरात जो बॅनर लागला आहे त्यावर ‘सुनेत्रा पवार बारामतीच्या भावी खासदार’ असा उल्लेख करण्यात आला आहे. मंत्रालयाच्या समोर असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर बॅनर लागल्याने चर्चांना उधाण आलं आहे. बारामती हा सुप्रिया सुळेंचा लोकसभा मतदार संघ आहे त्या मतदारसंघातून सुनेत्रा पवारांना उभं करण्याचा विचार अजित पवार गटाने पक्का केलेला दिसतो आहे. या बॅनरनंतर याच चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत?

लोकसभा निवडणुकीसाठी जर सुनेत्रा पवारांना तिकिट देण्यात आलं तर सुप्रिया सुळे शरद पवार गटाकडून उभ्या असतील आणि अझित पवार गटाकडून सुनेत्रा पवार. असं घडलं तर नणंद भावजय अशी लढत राष्ट्रवादीत पाहण्यास मिळेल. अर्थातच ही लढत चुरशीची होईल. त्यामुळे नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या नणंद भावजयीचं नातं आहे.

मंत्रालयाबाहेर लागलेला हा बॅनर चर्चेत

अजित पवार गटाने नुकतंच कर्जतमध्ये चिंतन शिबीर आयोजित केलं होतं. या चिंतन शिबिरात अजित पवार यांनी एक भाष्य केलं होतं. सातारा, शिरुर, रायगड आणि बारामती या चार लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट उमेदवार देणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं होतं. त्यानंतर दोनच दिवसात हा बॅनर लागला आहे. सुनेत्रा पवार बारामती मतदारसंघातून खासदार होतील हा दावा करत भावी खासदार सुनेत्रा पवार अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunetra pawar will be next mp of baramati banner near mantralaya area scj