वाशी येथील बांधकाम व्यावसायिक सुनील कुमार लोहारिया यांच्या खून प्रकरणाने आज आणखी एक वेगळे वळण घेतले असून सुनील कुमार यांचे भाऊ संजीव कुमार लोहारिया यांना परदेशातून व स्थानिक पातळीवर ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत. तशी तक्रार त्यांनी तुर्भे पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. दरम्यान या हत्याप्रकरणाचा तपास सीबीआय किंवा सीआयडीकडे देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
वाशीतील बांधकाम व्यावसायिक सुनील कुमार यांची १६ फेब्रुवारी रोजी निर्घृण हत्या झाली. त्यांच्या हत्या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यात सॅम्युअल अमोलिक या माजी पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे. अमोलिक याने या खुनाची कबुली दिली असली तरी हे प्रकरण येथेच संपत नाही. या खुनामागे आणखी एखादा बांधकाम व्यावसायिक आहे का याचा तपास केला जात आहे. तशी चौकशी सुरू असतानाच आज दिवंगत सुनील कुमार यांचे भाऊ संजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला व आपल्या पुतण्याला (सुनील कुमार यांचा मुलगा संदीप कुमार) ठार मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार केली. त्यांच्या मोबाइलवर येणारे फोन हे परदेशातील (सिंगापूर) व स्थानिक पातळीवरील असल्याचे त्यांनी सांगितले आहे. स्थानिक फोनवरील व्यक्ती स्वत:चे नाव सुरेश बिजलानी सांगत असल्याचे त्यांनी सांगितले. बिजलानी यांना सोमवारी पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले होते. या खून प्रकरणाला एक वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा