नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लान्बा यांचे स्पष्टीकरण; स्वदेशीकरणावर भर असल्याची माहिती

चीन आणि शेजारी देशांनी दक्षिण चीन समुद्रातील हक्कांबाबत असलेला वाद हेग येथील आंतरराष्ट्रीय लवादाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निवाडय़ाच्या चौकटीत परस्परांशी वाटाघाटी करून सोडवावा. चीनने या क्षेत्रात अन्य देशांचा नौकानयनाचा अधिकार मान्य करावा, अशी भारताची भूमिका आहे. तूर्तास भारतीय नौदल अमेरिकी नौदलाच्या बरोबरीने या क्षेत्रात संयुक्त टेहळणी करणार नाही. भारत कोणत्याही देशाबरोबर ‘जॉइंट नेव्हल पेट्रोलिंग’ (संयुक्त टेहळणी) करत नाही तर निवडक देशांबरोबर ‘को-ऑर्डिनेटेड नेव्हल पेट्रोलिंग’ (समन्वयाने टेहळणी) करतो, असे नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लान्बा यांनी सोमवारी मुंबईत स्पष्ट केले.

दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढत्या अरेरावीला आळा घालण्यासाठी अमेरिका मित्र देशांबरोबरील सहकार्य वाढवत आहे. मात्र भारत अमेरिकेबरोबर संयुक्त नाविक टेहळणी करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘जॉइंट नेव्हल पेट्रोलिंग’मध्ये दोन किंवा अधिक देशांच्या युद्धनौका समुद्राच्या एखाद्या भागात एकत्रित टेहळणी करतात. तर ‘को-ऑर्डिनेटेड नेव्हल पेट्रोलिंग’मध्ये सागरी सीमा लागून असलेले दोन देश सीमेच्या आपापल्या बाजूच्या भागात दुसऱ्या देशाच्या नौदलाच्या समन्वयाने टेहळणी करतात.

३१ मे रोजी नौदलप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लान्बा यांचा हा पहिलाच मुंबई दौरा होता. त्यांनी नौदलाच्या पश्चिम विभागाच्या मुख्यालयाला भेट देऊन अधिकारी व नाविकांशी संवाद साधला आणि नौदलाच्या युद्धसज्जतेचा आढावा घेतला. नौदलाच्या कुलाबा येथील ‘आयएनएस शिक्रा’ या हवाई तळावर त्यांनी संचलनाची पाहणी केली.

लान्बा यांनी नौदलाला देशापुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी सदैव सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने राबवण्यात येणाऱ्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमात नौदल सक्रिय सहभाग घेत असून स्वदेशीकरणावर भेर देत असल्याचे त्यांनी सांगितले. युद्धनौकांचा ढाचा बनवण्याबाबत भारताने १०० टक्के, गती देणाऱ्या यंत्रणांबाबत ६५ टक्के तर शस्त्रास्त्रांबाबत ४० टक्के स्वयंपूर्णता मिळवली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि खासगी उद्योगांच्या सहकार्याने त्यात भर घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या देशातील गोदींत ४६ युद्धनौकांची बांधणी सुरू आहे. नुकत्याच नौदलात दाखल झालेल्या ‘कामोर्ता’ वर्गातील नौकांच्या बाबतीत ९० टक्के स्वयंपूर्णता साधली गेली. स्वदेशातच बांधली जात असलेली नवी ‘आयएनएस विक्रांत’ ही विमानवाहू नौका डिसेंबर २०१८ पर्यंत नौदलात सामील होण्याची अपेक्षा आहे, असे लान्बा म्हणाले.

पाणबुडय़ांची घटती संख्या हा चिंतेचा विषय असल्याचे सांगून फ्रान्सच्या सहकार्याने मुंबईतील माझगाव गोदीत बांधण्यात येत असलेल्या सहा ‘स्कॉर्पीन’ (कलवरी) वर्गातील पाणबुडय़ा लवकरात लवकर नौदलाला मिळतील असे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. पाकिस्तान चीनकडून पाणबुडय़ांवरील ‘एअर इंडिपेंडंट प्रॉपल्शन’ (एआयपी) प्रणाली मिळवत आहे. मात्र पाकिस्तानला ती मिळाली तरी भारतीय नौदल त्याचा मुकाबला करण्यास सज्ज आहे. शिवाय भारतही ‘डीआरडीओ’च्या सहकार्याने अशा प्रकारची स्वदेशी यंत्रणा विकसित करत आहे, अशी माहिती लान्बा यांनी दिली.

आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकेवरील अपघाताची तसेच मुंबईजवळील समुद्रात दोन गस्ती नौकांना आग लागल्याच्या घटनांची चौकशी सुरू असून अहवालाची छाननी केल्यानंतर अपघाताची कारणे व जबाबदारी निश्चित होईल, असे ते म्हणाले. आयएनएस विक्रमादित्यवर तैनात करण्यासाठी रशियाकडून घेतलेल्या ‘मिग-२९ के’ लढाऊ विमानांमध्ये बिघाड होण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावर रशियाच्या सहकार्याने उपाययोजना केली जात असून या विमानांच्या दर्जात आणि उपलब्धतेत सुधारणा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

‘विराट’ संग्रहालयासाठी राज्यांकडून प्रस्तावाची प्रतीक्षा

आयएनएस विराट ही विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलात २९ वर्षांची सेवा बजावून येत्या वर्षअखेरीस निवृत्त होत आहे. जगातील सर्वाधिक काळ सेवेत राहिलेली युद्धनौका असा तिचा लौकिक आहे. तिचे संग्रहालयात रूपांतर करण्याबाबत संरक्षण मंत्रालयाने देशातील सर्व किनारी राज्यांना पत्रे पाठवली आहेत. त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यानंतर पुढील कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र अद्याप एकाही राज्याकडून प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याचे लान्बा यांनी सांगितले.