भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. “संजय राऊत हे सरड्यासारखं रंग बदलतात. तसेच, आग लावण्याचं आणि काडी करण्याचं काम करतात,” असं टीकास्र नितेश राणेंनी संजय राऊतांवर डागलं आहे. याला आता आमदार सुनील राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
नितेश राणेंनी काय म्हटलं होतं?
“संजय राऊत हे रंग बदलणारे सरडा आहेत. ते उरलेली शिवसेनेही संपवतील. महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत आहेत. गौतमी पाटील जशी वेगवेगळ्या कार्यक्रमात जाऊन लोकांचं मनोरंजन करते, नाचते, लोकांना नाचवते, ती एक उत्तर कलाकार आहे. शिवाय लोकांमध्ये ती लोकप्रिय आहे,” असं नितेश राणेंनी म्हटलं.
हेही वाचा : “नव्या संसद भवनाची इमारत बांधताना कोणालाही…”, शरद पवारांचा मोदी सरकारवर आरोप
“गौतमीसारखं राऊत रोज सकाळी येऊन लोकांचं मनोरंजन करतात”
“गौतमी पाटील मनोरंजन करत असल्याने लोकांना बघायला आवडते. पण, गौतमीसारखं राऊत रोज सकाळी येऊन लोकांचं मनोरंजन करतात. कोणाचीतरी सुपारी घेऊन आग लावण्याचं काम ते करतात. हा सकाळचा कार्यक्रम बंद झाला पाहिजे,” असं नितेश राणेंनी सांगितलं.
“…तर साडेतीन महिने तुरूंगात गेले नसते”
नितेश राणेंनी संजय राऊतांवर केलेल्या टीकेवर सुनील राऊतांनी ‘टीव्ही ९ मराठी’ला प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्र आणि देशाला माहिती सरड्यासारखं रंग कोण बदलतं. संजय राऊत सरड्यासारखे रंग बदलत असते, तर साडेतीन महिने तुरूंगात गेले नसते. तुरुंगाच्या भीतीने काँग्रेस, भाजपा, स्वाभिमान असं अनेक रंग बदलणारे कोण आहेत? त्यामुळे नितेश राणे काय बोलतात याला किंमत देण्याची गरज नाही.”
“भाजपाने काही कुत्रे पाळले आहेत”
नितेश राणेंनी तेजस ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. यावर प्रश्न विचारल्यावर सुनील राऊत म्हणाले, “भाजपाने काही कुत्रे पाळले आहेत. शिवसेनेवर भुंकणे हे एकच काम त्यांना आहे. पण, शिवसेना ही वाघ आणि हत्तीसारखी आहे. अशा गोष्टीकडं दुर्लक्ष करावे. शिवसेना मजबूत असून, उद्धव ठाकरेंचं नेतृत्व खंबीर आहे.”