राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर पक्ष कुणाचा, पक्षचिन्ह कुणाचं, पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष कोण हा वाद आता केंद्रीय निवडणूक आयोगासमोर गेला आहे. शुक्रवारी (६ ऑक्टोबर) यावर सुनावणी झाली. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने अजित पवार गटातील बंडखोर आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना अजित पवार गटातील खासदार सुनील तटकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनील तटकरे म्हणाले, “या प्रश्नांवर आमच्याकडे सर्व उत्तरं आहेत. प्रत्यक्षात सुनावणीतील युक्तिवादात जेव्हा हे मुद्दे येतील त्यावेळी ती उत्तरं आम्ही मांडू. आम्ही या गोष्टीची कायदेशीर व वैधानिक खातरजमा करूनच आम्ही हे पाऊल उचललं आहे. आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून हा निर्णय घेतला. त्यामुळे मी आत्ताही दावा करतो की, लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही घेतलेल्या निर्णयावर निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब आम्हाला मिळावं अशी आमची सर्वांची भावना आहे.”

“अजित पवारांची कुठल्याही पद्धतीची नाराजी नाही”

“आमच्या काळात अजित पवार नाराज व्हायचे नाहीत, पण आत्ताच्या सरकारमध्ये अजित पवार वारंवार नाराज होत आहेत”, या उद्धव ठाकरेंच्या टीकेला सुनील तटकरेंनी उत्तर दिलं. ते म्हणाले, “अजित पवार नाराज आहे हे उद्धव ठाकरेंना कुठून कळलं हे मला माहिती नाही. काल परवा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी स्वतः अजित पवारांच्या आजारपणाबद्दल खुलासा केला होता. अजित पवारांची कुठल्याही पद्धतीची नाराजी नाही.”

हेही वाचा : डीनला संडास साफ करायला लावण्याच्या घटनेवर उद्धव ठाकरे म्हणाले, “मस्तवाल, गद्दार खासदाराने…”

“उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना सल्ला देण्यापेक्षा त्यांचं सरकार का पडलं शोधावं”

“आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून तो निर्णय घेतला. त्यामुळे नाराजी अजिबात नव्हती. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये सगळं चांगलं होतं असं त्यांना म्हणायचं आहे का? त्यांच्या पक्षात आलबेल होतं का? त्यांच्या पक्षात सगळं व्यवस्थित असतं तर पुढील घटना पाहायलाच मिळाल्या नसत्या. त्यामुळे त्यांनी अजित पवारांना सल्ला देण्यापेक्षा आपलं महाविकासआघाडीचं सरकार का गेलं याचं उत्तर शोधावं अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे,” असं म्हणत सुनील तटकरेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil tatkare answer sharad pawar faction demand of rebel mla disqualification pbs
Show comments