उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याने राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीला गैरहजर राहिल्याची जोरदार चर्चा आहे. तसेच पालकमंत्रीपदावरून नाराजीमुळे ते दिल्लीला होणाऱ्या बैठकीलाही गेले नाहीत, असेही तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी यावर प्रतिक्रिया देत भूमिका स्पष्ट केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनील तटकरे म्हणाले, “अजित पवार नाराज असल्याने मंत्रीमंडळ बैठकीला आणि केंद्राच्या बैठकीला गैरहजर होते अशा कपोलकल्पित कथा आणि अफवा पसरवण्याचं काम केलं जात आहे. अजित पवारांची तब्येत ठीक नसल्याने त्यांच्या राजकीय आयुष्यात पहिल्यांदा ते गैरहजर राहिले. कोविड काळातही मंत्रालयात आणि पुण्यात बैठका घेणारे एकमेव नेते म्हणून अजित पवारांची महाराष्ट्रात ओळख आहे. अजित पवारांचं प्रशासकीय कौशल्य अत्यंत वाखाणण्यासारखं आहे. ते बैठकीला अन्य कारणाने कधीही अनुपस्थित राहिले नाही.”

“तब्येत बरी नसल्याने अजित पवार गैरहजर”

“तब्येत बरी नसल्याने अजित पवार केवळ आजच्या बैठकीला उपस्थितीत नाहीत. ते रात्रीच्या आमदारांच्या बैठीकालाही उपस्थित नव्हते. त्यामुळे गैरसमज पसरवण्याचा, अफवा पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. तो चुकीचा आणि निंदनीय आहे,” असं मत सुनील तटकरेंनी व्यक्त केलं.

“अमित शाहांच्या मुंबई भेटी वेळीही अजित पवारांचा बारामती दौरा”

सुनील तटकरे पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्ली भेट नियोजित आहे की, कशी आहे हे मला माहिती असण्याचं कारण नाही. मात्र, अजित पवार प्रकृती ठीक नसल्याने सहभागी झालेले नाहीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या मुंबई भेटी वेळीही अजित पवारांचा पूर्वनियोजित बारामती दौरा होता. त्यामुळे ते तेव्हा भेटीला उपस्थित राहू शकणार नाही हे अजित पवारांनी आधीच स्पष्ट केलं आहे. तसेच याबाबत अमित शाहांसह शिंदे-फडणवीसांनाही याची माहिती दिल्याचं सांगितलं आहे.”

हेही वाचा : “हनीमून संपायच्या आधीच यांच्यात…”, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला; म्हणाल्या, “आज सकाळी…”

“कपोलकल्पित अफवा पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न”

“राज्यात महायुतीचं सरकार प्रखरतेने काम करत आहे. जनमाणसात या सरकारची प्रतिमा उंचावली आहे. त्यामुळे ज्यांच्या मनात राजकीय अस्वस्थता निर्माण झाली आहे ते लोक अशा कपोलकल्पित अफवा पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत,” असंही तटकरेंनी म्हटलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil tatkare comment on speculations of unhappy ajit pawar pbs
Show comments