राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या ठरावावरील चर्चेच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी राजकीय गुगल्या टाकत भाजपमधील असंतुष्ट महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि सत्तेत राहूनही विरोधी पक्षासारखे वर्तन करणाऱ्या शिवसेनेला भाजपविरोधात चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. तटकरे यांनी घेतलेल्या उलट तपासणीमुळे खडसे आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना अभिभाषणात राहून गेलेल्या चुकांची कबुली द्यावी लागली.
 मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची युती सरकार भाषा करीत आहे, परंतु राज्यपालांच्या अभिभाषणात तब्बल २७ इंग्रजी शब्द वापरल्याचे निदर्शनास आणून देऊन, तटकरे यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यावर दिवाकर रावते सभागृहात आले आणि अभिभाषणातील इंग्रजी शब्द बदलावेत असे आपण सांगितले होते, तरीही त्या चुका राहिल्या अशी कबुली दिली. पुढच्या वेळी अशा चुका होणार नाहीत, याची ग्वाही देतो, या रावते यांच्या बचावात्मक पवित्र्यावर, तुम्ही सत्तेत असाल की नाही, याबद्दल तुम्हाला खात्री आहे का, असा तटकरेंनी गुगली टाकला. मात्र खडसे यांनी प्रफुल्लभाई पटेल आमच्याबरोबर आहेत, त्यामुळे आम्हाला चिंता नाही, असा फटका मारताच, काँग्रेसच्या तंबूत चांगलाच हशा पिकला.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्याबाबत अभिभाषणात उल्लेख आहे, परंतु बाळासाहेब ठाकरे यांचा सरकारला विसर पडला काय, अंगार  विझला काय, असे प्रश्न करुन तटकरे यांनी शिवसेनेला चिथवण्याचा प्रयत्न केला. त्यावर शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज नाही, असे तटकरेंना प्रत्युत्तर दिले. खडसे यांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्याबद्दलचा अधूनमोधून तटकरे उल्लेख करत होते. खडसे यांना त्यांचा डिवचण्याचा प्रयत्न होता. परंतु मुरलेले खडसे तटकरेंच्या तिरकस फटकेबाजीला खाली बसूनच दाद देत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा