लोकसभा निवडणुकीत तोंडावर आपटल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीची रणनिती आखण्यास सुरुवात केली असून, त्याचाच एक भाग म्हणून राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक मुंबईमध्ये सुरू आहे. त्यामध्येच नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड करण्यात आली. मावळते प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी सुनील तटकरेंच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला पक्षाचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, मधुकर पिचड यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर भास्कर जाधव यांनीच सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा केली.
प्रदेशाध्यक्षपदासाठी तटकरे यांच्याबरोबरच छगन भुजबळ आणि आर. आर. पाटील यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात चितळे समितीच्या अहवालात तटकरे यांच्यावर ठपका नसल्याने त्यांचा मार्ग मोकळा झाल्याचे समजते आणि त्यांचीच प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. तटकरे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविण्यात आल्यामुळे भास्कर जाधव यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

Story img Loader