मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका करताना सभ्य भाषा वापरावी. अजित पवार यांच्याविषयी बोलताना अथवा लिहिताना त्यांनी आपली पातळी सोडू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सामना’ या मुखपत्रात राऊत यांनी अजित पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा तटकरे यांनी समाचार घेतला. अजित पवार यांचा उल्लेख संजय राऊत ‘सिंचनदादा’ म्हणून करत आहेत. मात्र महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर अजित पवार हे उत्तम काम करीत आहेत, असे हेच संजय राऊत म्हणत होते. अजित पवार यांच्या प्रशासनावर असलेल्या हुकमतीविषयी राऊत त्यांचे कौतुक करत होते. राऊत यांनी दुटप्पीपणा थांबवावा, असे मत तटकरे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा >>> खडसे यांना नियमित जामीन; अटकेविना नियमित जामीन मिळणारे खडसे हे एकमेव माजी मंत्री

माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे अशोक चव्हाण, अजित पवार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीत भेटले होते. त्यानंतर ठाकरे हे भाजपबरोबर जाण्यास इच्छुक असल्याचे याच संजय राऊत यांनी मला सांगितले होते. त्या वेळी आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकरदेखील त्यांच्याबरोबर होते. मात्र त्या वेळी काय चर्चा झाली ते मी सांगणार नाही. मात्र ते ‘भाजपबरोबर जाणे आवश्यक आहे,’ असे वारंवार सांगत होते, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. पत्रकार म्हणून तुम्हाला अधिकार आहे; पण लिखाणात सुसंस्कृतपणा हवा, असा टोमणा तटकरे यांनी राऊत यांना हाणला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil tatkare warn sanjay raut for controversial writing on ajit pawar zws