लाखो शिवसैनिकांच्या साक्षीने आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जगाचा निरोप घेतला. दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर पुत्र उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेबांना मंत्राग्नी दिला तेव्हा अनेकांना आपले अश्रू अनावर झाले. फक्त ठाकरे कुटुंबीयच नव्हे तर शिवाजी पार्कवर उपस्थित असलेला प्रत्येक जण भावनाविवश झाल्याचे पहावयास मिळत होते. “परत या परत या, बाळासाहेब परत या” आणि “बाळासाहेब अमर रहे”चा जयघोष आसंमंत दुमदुमून टाकत होता. गेली पाच दशके धडधडणारी एक तोफ आज शांत झाली. गेली चार दशके ज्या व्यक्तीने शिवाजी पार्कचे मैदान आपल्या शब्दांनी गाजवले त्याच मैदानात आपल्या लाडक्या शिवसेनाप्रमुखांचा निष्प्राण देह पाहून लाखो शिवसैनिक शोकसागरात बुडाल्याचे चित्र पहावयास मिळत होते. शिवाजी पार्कवर लाखोंच्या उपस्थितीत बाळासाहेबांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आजवरच्या इतिहासात प्रथमच शिवाजी पार्कवर कोणावरतरी अंत्यसंस्कार करण्यात आले असून अंत्यविधीसाठी सरकारकडून विशेष परवानगी देण्यात आली होती.  

Story img Loader