अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रातील लेख ग्रंथरूपाने
महाराष्ट्रात गेल्या पाव शतकापासून विवेकवादी समाजाच्या घडणीसाठी प्रयत्नरत असणाऱ्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ (अंनिस)च्या कार्य व विचारांचा आलेख आता एका ग्रंथप्रकल्पाच्या रूपाने वाचकांच्या भेटीला येत आहे. ‘अंनिस’चे मुखपत्र असणाऱ्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’त गेल्या पंचवीस वर्षांत प्रकाशित झालेले लेखन आता ‘समग्र अंधश्रद्धा निर्मूलन’ या ग्रंथप्रकल्पामुळे एकत्र वाचता येणार आहे.
‘अंनिस’च्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ या मुखपत्राला यंदा पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. अंनिसच्या स्थापनेपासून आतापर्यंतची वाटचाल त्यातील यशापयश, खाचाखोचा, आचार-विचार, कृती-सिद्धांतासकट वार्तापत्रात शब्दबद्ध झाली आहे. हे लेखन आता ‘समग्र अंधश्रद्धा निर्मूलन’ या तीन खंडांतील ग्रंथप्रकल्पामुळे एकत्र वाचता येणार आहे.
या पुस्तकांमध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंनिसची चळवळ, बुवाबाजीविरुद्धचा संघर्ष, जादूटोणाविरोधी कायदा आदी विषयांवर लिहिलेल्या लेखांची चार पुस्तके असणार आहेत. याशिवाय अंनिसच्या कार्यकर्त्यांनी उघड केलेल्या बुवाबाजींवरील तसेच अंनिसने केलेली आंदोलने, मोहिमा, यात्रा यांचा आढावा असणार आहे. तसेच इतर पुस्तकांमध्ये वार्तापत्रात वेळोवेळी घेण्यात आलेल्या अभ्यासक, विचारवंत व कार्यकर्त्यांच्या मुलाखती, विविध धर्मस्थळांविषयक चिकित्सक लेख, जातीअंताचा लढा, जातपंचायत, स्त्रीमुक्ती आदी विषयांवरील लेख, वार्षिक अंकातील परिसंवाद आदींचाही समावेश करण्यात आला आहे. हे खंड सप्टेंबर महिन्यापर्यंत वाचकांच्या हाती येणार आहेत. त्याचे संपादन प्रभाकर नानावटी, प. रा. आर्डे, राहुल थोरात, राजीव देशपांडे, मुक्ता दाभोलकर, उमेश सूर्यवंशी यांनी केले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील २५ वर्षे चालू असलेले हे देशातील एकमेव मासिक आहे. आतापर्यंत यात ८०० लेखक व कार्यकर्त्यांनी वैचारिक लेखन केले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा २५ वर्षांतील वैचारिक प्रवास या खंडांमध्ये वाचायला मिळेल. एकूण १५ विषयांवरील १५ पुस्तके या तीन खंडात असणार आहेत.
– प्रभाकर नानावटी, संपादक