मुंबई : भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये जाणीवपूर्वक हळदी-कुंकू, दुष्ट शक्तीला पळवून लावण्यासाठी रांगोळी काढणे आणि त्याचे समर्थन करणे अशा अवैज्ञानिक व अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या विचारांची मांडणी कशासाठी केली जात आहे, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात सुरू असलेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये इंडियन विमेन्स काँग्रेसच्या चर्चासत्रात अवैज्ञानिक व अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी मांडणी दोन महिलांनी केली. कांचन गडकरी यांनी हळदी-कुंकवाचे महत्त्व सांगितले, तर भाजपच्या नेत्या कल्पना पांडे यांनी घराबाहेर रांगोळी काढल्याने दुष्ट शक्ती येत नाहीत, असे सांगितले. रांगोळीने जर दुष्ट शक्ती येत नसतील तर कांचन गडकरी व कल्पना पांडे यांना चीन, पाकिस्तानच्या सीमेवर पाठवून द्या आणि तिथे रांगोळय़ा काढा, असा सल्ला त्यांनी दिला. अतुल लोंढे म्हणाले की, वैज्ञानिक व तंत्रवैज्ञानिक प्रगतीमुळे माणसांच्या जीवनात खूप सकारात्मक बदल झाले आहेत. आरोग्य, सुरक्षा, कृषी, ऊर्जा विभागासह अनेक क्षेत्रात मोठी प्रगती केलेली आहे. नागपूर विद्यापीठात सुरु असलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये सामाजिक कार्यकर्त्यां कांचन गडकरी यांनी हळदी कुंकवाचे महत्व सांगणे व संयोजिका कल्पना पांडे यांनी घराबाहेर रांगोळी काढल्याने घरात दुष्टशक्ती येत नाहीत असा सल्ला देणे अयोग्य आहे. त्यावर वैज्ञानिक महिलांनी आक्षेप घेतला हे योग्यच झाले आणि काँग्रेस पक्षही अशा प्रकारच्या विचारसरणीचा निषेध करतो.