मुंबई : भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारची घरोघरी तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कंबर कसली आहे. मुंबई महानगरपालिकेने ३५ लाख राष्ट्रध्वजाचे मोफत वितरण करण्याचा संकल्प सोडला आहे. मात्र कंत्राटदाराकडून तब्बल तब्बल एक लाख ५० हजार सदोष राष्ट्रध्वजांचा पुरवठा करण्यात आल्याची बाब निदर्शनास आली. मुंबई महापालिकेने तात्काळ सदोष राष्ट्रध्वज कंत्राटदाराला परत केले. कंत्राटदाराने राष्ट्रध्वज बदलून दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून देशभरात येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात येणार आहे. देशवासियांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना मोफत राष्ट्रध्वज देण्याचा संकल्प सोडला आहे. मुंबईतील ३५ लाख घरांमध्ये राष्ट्रध्वजाचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. आपल्या संकल्पपूर्तीसाठी मुंबई महानगरपालिकेने ३५ लाख राष्ट्रध्वजाची खरेदी केली. मुंबई महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या माध्यमातून राष्ट्रध्वजांचे घरोघरी वितरण करण्यात येत आहे. खरेदी केलेले राष्ट्रध्वज विभाग कार्यालयांकडे सुपूर्द केल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ते सदोष असल्याचे निदर्शनास आले.
मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलेल्या राष्ट्रध्वजाचा आकार कमी-जास्त होता, काही राष्ट्रध्वजांवर एका बाजूला अशोकचक्र होते, काही ध्वजांना छिद्र पडली होती, तर काहींचा रंग फिका असल्याचे निदर्शनास आले होते. सदोष राष्ट्रध्वज वेगळे करून ते संबंधित कंत्राटदाराकडे पाठविण्यात आले. कंत्राटदाराने या बदल्यात दुसरे राष्ट्रध्वज उपलब्ध केले असून लवकरच राष्ट्रध्वजांचे वितरण पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कंत्राटदाराने सदोष राष्ट्रध्वजांचा पुरवठा करून ध्वजसंहितेचे उंल्लंघन केले आहे. ध्वजसंहितेत नमुद केलेल्या नियमानुसार राष्ट्रध्वजाचा आकार, रंगसंगती, अशोकचक्र असणे आवश्यत आहे. मात्र कंत्राटदाराकडून राष्ट्रध्वजाचा अपमान झाला आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून केली आहे.