महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठीपणा जपत असताना डोंबिवलीच्या त्यांच्याच नगरसेवकाच्या इमारतीत सुरू असलेल्या रॉयल महाविद्यालयात मराठी विषयाची गळचेपी होत असल्याचे दिसत आहे. महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील मराठी विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना तेथील अमराठी शिक्षक दमदाटी करून मराठी सोडून इतर विषय घेण्यास भाग पाडत आहेत व तसे न केल्यास प्रॅक्टीकलचे ‘अंतर्गत गुण’ मिळणार नसल्याची धमकीही हे शिक्षक या विद्यार्थ्यांना देत आहे. शिवाय १६ वर्षे प्रामाणिक सेवा करणाऱ्या मराठी शिक्षकांवर त्याच्या कामाचा भार कमी (वर्कलोड) कमी करून त्याला अध्र्या पगारावर काम करण्यास धमकाविले जात आहे. हे सर्व प्रकार तेथील अमराठी प्राचार्य तिवारी यांच्या वरदहस्तानेच सुरू असल्याचा आरोप पिडीत मराठी शिक्षकाने केला आहे.
मराठी विषय अनिवार्य असताना तो विषयच प्रवेश अर्जातून हद्दपार करण्याचा घाट या महाविद्यालयात सुरू असून गुणवत्तेचे निकष न जुमानता सी.एस., आय.टी. व इलेक्ट्रॉनिक्स विषय घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी मराठी विषय न घेण्याची सक्ती करण्यात येत आहे.
या महाविद्यालयात सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीप्रमाणे वेतन देण्याबाबत शिक्षण उपसंचालकांनी आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी प्राचार्य तिवारी व अध्यक्ष रजनीकांत शहा हे करीत नाहीत. यामुळे या महाविद्यालयावर त्वरित शासकीय प्रशासक नेमण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. मराठी विषयाच्या नंदिनी सावंत या १६ वर्षे कायमस्वरुपी सेवेत असताना पर्यावरणशास्त्राचा कार्यभार देण्याऐवजी तात्पुरत्या तत्वावरील नियुक्त शिक्षकाला तो कार्यभार दिला गेला. मात्र संचमान्यतेसाठी त्या व्यक्तीचा कार्यभार दाखविला न गेल्याचेही या शिक्षकांनी सांगितले., तसेच कर्मचाऱ्यांना वेळेत पगार न देणे, शिपाई कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देणे, महिला कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरणे तसेच त्यांना नियमबाह्य़ उशीरापर्यन्त थांबविणे व सुटीच्या दिवशी कामावर बोलावून त्यांना नाहक मानसिक त्रास देण्याचे काम हे महाविद्यालय करीत असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. या संदर्भात विचारले असता महाविद्यालयाचे प्राचार्य तिवारी यांनी आमच्या बदनामीचा  हा डाव असल्याचे सांगितले.

Story img Loader